नवी मुंबई | 7 ऑक्टोबर 2023 : पोलिसांच्या ताब्यातून एक आरोपी नाटकीयरित्या पळून गेल्याचा व्हिडिओ सध्या बराच व्हायरल (vrial video) झाला आहे. नवी मुंबई पोलिसांनी ड्रग्जसंदर्भात (drug case) एक छापा टाकत एका नायजेरियन नागरिकाला अटक केली होती. उलवे येथील सेक्टर २४ परिसरात ड्रग्ज माफियांचा वाढता कारनामा रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाई करत छापा टाकला होता. मात्र बेड्या ठोकलेल्या असतानाही तो पोलिसांना हिसका देऊन तेथून निसटला. याघटनेचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.
व्हिडीओमधून उलगडला थरार
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विट) वर हा व्हिडीओ बरेचदा शेअर झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक पोलीस कर्मचारी आरोपीला पकडून पोलीस व्हॅनच्या दिशेने नेताना दिसत आहे. ते चालत असतानाच आरोपीने पटकन पोलिसाला धक्का देत हाताला हिसका दिला आणि तो हात सोडवून तेथून पळून गेला.
आरोपी निसटल्याचे लक्षात येताच इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने कारवाई करत त्याचा पाठलाग करण्यास सुरूवात केली. मात्र धावता धावता एक पोलिस अधिकारी खाली कोसळला. इतर कर्मचारी मात्री जीवाची बाजी लावून आरोपीला पकडण्यासाठी वेगवेगळ्या दिशेने धावले. तर काही पोलिस अधिकाऱ्यांनी बाईक काढून, त्याचा पाठलाग सुरू केला. मात्र त्याला पुन्हा पकडून अटक करण्यात यश मिळाले की नाही, याबद्दल काही समजू शकले नाही.
एका नायजेरियन नागरिकाला दुसर्या ड्रग छाप्यात अटक झाल्यानंतर ही घटना घडली आहे. खारघर पोलिसांनी एका नायजेरियन नागरिकाला अटक केली आणि 6 लाख रुपये किमतीचे मेथाक्वॉलोन ड्रग (MD) जप्त केले. खारघर येथील सेक्टर 13 मध्ये तो अंमली पदार्थ विकण्यासाठी आला होता. चुकवुबुका अबेल उदेह असे अटक केलेल्या नायजेरियनचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून 60 ग्रॅम मेथाक्वालोन ड्रग जप्त केले.
अटकेसाठी असा रचला सापळा
मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचून त्याला मालासह पकडले. पोलिसांना पाहून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा बराच पाठलाग करून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आणि त्याच्याकडून 60 ग्रॅम मेथाक्वॉलोन ड्रग ताब्यात घेण्यात आले, असे खारघर पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्याच्याविरोधात खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.