Sandeep Godbole | शरद पवारांच्या निवासस्थानावरील हल्ला प्रकरण, संदीप गोडबोलेला दोन दिवसांची पोलिस कोठडी
सरकारी वकील प्रदीप घरात यांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप गोडबोले या सगळ्या कटात सूत्रधार म्हणून काम पाहत होता. त्याला आज कोर्टाने 16 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानावर एसटी आंदोलकांनी केलेल्या कथित हल्ला केल्या प्रकरणी नागपुरातून अटक करण्यात आलेल्या संदीप गोडबोलेला (Sandeep Godbole) मुंबईतील कोर्टाच्या दंडाधिकाऱ्यांनी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्या सांगण्यावरूनच पवारांच्या घरावर एसटी कर्मचारी धडकल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यानुसार सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटकही करण्यात आली होती. तर पवारांच्या घरावरील हल्ल्याचं नागपूर कनेक्शनही उघड झालं आहे. नागपुरातील एसटी कर्मचारी संदीप गोडबोलेला मुंबई पोलिसांनी बुधवारी रात्री ताब्यात घेतलं होतं. गोडबोले महाराष्ट्र राज्य परिवहन विभागात यांत्रिक पदावर कार्यरत असून पवारांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याच्या वेळी तो सदावर्तेंच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे.
गोडबोले आमदार निवासमध्ये थांबला
सरकारी वकील प्रदीप घरात यांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप गोडबोले या सगळ्या कटात सूत्रधार म्हणून काम पाहत होता. त्याला आज कोर्टाने 16 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे. गोडबोले आमदार निवासमध्ये थांबला होता. त्याने कोर्टासमोर स्वतः हे मान्य केलं आहे. कोणत्या आमदाराच्या ओळखीवरून तो आमदार निवासला थांबला हे तपासायच आहे चौकशी केली जाईल, असंही वकिलांनी सांगितलं.
गोडबोलेला पोलीस कोठडी, एएनआयचे ट्वीट :
Mumbai | Sandeep Godbole who was arrested from Nagpur in connection with an alleged attack on NCP chief Sharad Pawar’s residence by MSRTC protesters sent to two-day police custody by magistrate at Esplanade Court.
— ANI (@ANI) April 14, 2022
सदावर्तेंना न्यायालयीन कोठडी
8 एप्रिल रोजी झालेल्या राड्याबाबत वकील गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यांना कोर्टात हजर केलं असता आधी दोन आणि पुन्हा दोन अशी चार दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर काल सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याचबरोबर सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्यात आलाय. इतकंच नाही तर सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांना सहआरोपी करण्यात आल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी माध्यमांशी बोलताना दिली होता.
संबंधित बातम्या :
पवारांच्या घरावरील हल्ल्याचं नागपूर कनेक्शन अखेर उघड
सदावर्तेंवर तिसऱ्यांदा वकील बदलण्याची वेळ, न्यायलयीन कोठडीत रवानगी, कोर्टातला युक्तीवाद वाचलात?