लातूर : शेतीच्या वादातून शेजाऱ्याने घरजावयाची हत्या केल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये घडली आहे. सतीश जमादार असे मयत जावयाचे नाव आहे. या हत्येप्रकरणी रेणापूर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. गेल्या सहा वर्षांपासून मयत सतीश जमादार हे सासरवाडीत रहायला आले होते. त्यांचे सासरे आणि शेजारी यांच्यात बांधावरून वाद होता. या वादातून जावयाचा बळी गेला आहे. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. लातूर जिल्ह्यातल्या समसापूर येथे ही घटना घडली. बांधावर माती टाकताना सुरु झालेल्या वादातून जावयावर वार करण्यात आले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सतीश यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
समसापूर येथे सतीश यांच्य सासऱ्याची जमीन आहे. या जमिनीच्या शेजारी असलेल्या शेतकऱ्यासोबत सतीशच्या सासऱ्याचा सामाईक बांधावरुन वाद होता. हा वाद न्यायालयात रेणापूर न्यायालयात प्रलंबित होता. शुक्रवारी सकाळी जमादार यांचे सासरे शेताच्या बांधावर लेवल करण्याचे काम सुरु होते. यावेळी सतीश जमादार, त्यांची पत्नी, मेहुणा आणि सासूही शेतात उपस्थित होते. यावेळी शेजारी भारत फुलसे आणि त्याच्या परिवाराने सतीशची सासरे बळीराम खोडके यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर शिवीगाळ केली.
वाद इतका विकोपाला गेला फुलसे कुटुंबीयांनी खोडके यांचा जावई सतीशवर जीवघेणा हल्ला केला. खोडके कुटुंबीयांनी सतीशला तात्काळ रेणापूर येथील रुग्णायलात नेले. डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी लातूर येथील रुग्णालयात पाठवले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रेणापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी मेव्हणा आणि सासऱ्याच्या फिर्यादीवरुन जमादार यांच्या हत्येप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.