शत्रूला अडकवण्यासाठी परफेक्ट प्लानिंग केलं, ते अंमलातही आणलं, पण घटना उघड होताच…
राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही. राजकारणात व्यक्तीला रक्ताच्या नात्याचाही विसर पडतो अन् व्यक्ती नको ते करुन बसतो. अशीच एक घटना उघडकीस आली आहे.
बुलंदशहर : निवडणुकीच्या पूर्ववैमनस्यातून विरोधकांना हत्येच्या आरोपांमध्ये अडकवण्यासाठी काकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये उघडकीस आली आहे. बलवीर सिंह असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून, त्याचा पुतण्या दान सिंह याला पोलिसांनी अटक केली आहे. दान सिंहने काका बलवीरच्या डोक्यात काठीने वार करून हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेह काही अंतरावर असलेल्या जंगलातील आंब्याच्या बागेत फेकून दिला होता. हत्याकांड आणि त्यामागील धक्कादायक कारणाचा उलगडा होताच पोलिसही चक्रावून गेले आहेत.
कामानिमित्त बाहेर गेला तो परतलाच नाही
बुलंदशहर जिल्ह्यातील नरसेना पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ताहारपूर गावात 10 मे रोजी ही हत्येची घटना घडली होती. त्यादिवशी बलवीर हा काही कामानिमित्ताने औरंगाबाद येथे गेला होता. तेथून तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला असता नरसेना पोलीस ठाण्याच्या हद्दीत बलवीरचा मृतदेह आढळून आला. बलवीरची हत्या त्याचा पुतण्या दान सिंहने केल्याचे व त्यामागे विरोधकांना गोवण्याचे षडयंत्र उघडकीस आल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
विरोधकांना गोवण्यासाठी काकाच्या हत्येचा कट रचला
निवडणुकीच्या मुद्द्यावरून दान सिंहचे गावातील विरोधी पार्टीतील लोकांशी भांडण सुरू होते. त्या विरोधकांना हत्येच्या प्रकरणात गोवण्याचे कुटील षडयंत्र दान सिंह याने रचले होते. यासाठी त्याने थेट आपल्या काकाच्याच हत्येचा प्लॅन आखला आणि त्यानुसार काकावर जीवघेणा हल्ला करत त्याला ठार केले. निवडणुकीतील वैमनस्यामुळे दान सिंहचा बाप तुरुंगात आहे. जुन्या खटल्यात निर्णय घेण्याच्या हेतूने त्याने काकाची हत्या केल्याचे समोर आले आहे.
स्थानिक पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने आरोपी दान सिंहचा शोध घेतला आणि त्याला अटक केली. त्याच्या ताब्यातून हत्येसाठी वापरण्यात आलेले हत्यार जप्त केले आहे. दान सिंहची कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची तुरुंगात रवानगी केली.