जन्मानंतर अवघ्या 10 मिनिटात नवजात बालकाने अखेरचा श्वास, मोखाडा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
खोडाळा जवळील तळ्याची वाडी येथील मयुरी अनिल वाघ या 19 वर्षीय गर्भवतीला प्रसुती वेदना होऊ लागल्याने खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. मात्र येथे पुरेशी साधन सामग्री नसल्याने तिला मोखाडा ग्रामीण रुग्णालयात रेफर करण्यात आलं.
पालघर / जितेंद्र पाटील : उपचाराअभावी एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना पालघरमधील खोडाळा येथे घडली आहे. खोडाळा तालुक्यातील तळ्याची वाडी येथे ही धक्कादायक घटना घडली. यानंतर जव्हार मोखाडा या भागात आरोग्य विभागाचा उडालेला बोजवारा पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. या घटनेमुळे महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयात एकच गोंधळ सुरु केला. योग्य उपचाराअभावी बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.
ग्रामीण रुग्णालयात सुविधा नसल्याने तालुका रुग्णालयात पाठवले
खोडाळा जवळील तळ्याची वाडी येथील मयुरी अनिल वाघ या 19 वर्षीय गर्भवतीला प्रसुती वेदना होऊ लागल्याने खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. मात्र येथे पुरेशी साधन सामग्री नसल्याने तिला मोखाडा ग्रामीण रुग्णालयात रेफर करण्यात आलं. रुग्णालयात पोहोचताच या महिलेची प्रसुती झाली, मात्र जन्मानंतर अवघ्या 10 मिनिटात बाळाचा मृत्यू झाला. वेळेत उपचार न मिळाल्याने या नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात येतोय.
नातेवाईकांचा रुग्णालयावर आरोप
बाळाच्या गळ्याभोवती नाळेचा वेढा असल्याचं काही महिन्यांपूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांना तपासणी समजलं होतं. मात्र त्याचवेळी त्यांनी आम्हाला कल्पना देऊन योग्य उपचार केले असते तर बाळ आणि माता दोन्ही सुखरूप असते, असं नातेवाईकांनी सांगितले. याप्रकरणी खोडाळा प्राथमिक उपचार केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आरोपाचे खंडन
मात्र मातेची नॉर्मल प्रसुती होईल अशी परिस्थिती नसल्याने खोडा प्राथमिक आरोग्य केंद्रातून तिला रेफर करण्यात आलं. जर त्याच ठिकाणी शस्त्रक्रिया करून प्रसुती करण्याचा प्रयत्न केला गेला असता तर अति रक्तस्त्रावामुळे मातेचा आणि बाळाचा असा दोघांचाही मृत्यू झाला. त्यामुळे या गरोदर मातेला मोखाडा ग्रामीण रुग्णालयात रेफर केलं गेलं असल्याचं तालुका वैद्यकीय अधिकारी आबासाहेब चत्तर यांनी सांगितलं.