Bishnoi Gang : बिश्नोई गँगमध्ये नवा ‘गँगस्टर’; NIA हात धुवून लागली पाठी, 10 लाखांचं बक्षीस, आहे कोण हा नवीन भाई ?
कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या अडचणींमध्ये आता वाढ झाली आहे. लॉरेन्स नंतर आता दुसऱ्या गँगस्टर विरोधात NIAने मोठी मोहीम उघडली असून त्याला मोस्ट वाँटेड घोषित करत 10 लाखांच बक्षीसही जाहीर केलं आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याची गँग पुन्हा चर्चेत आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो प्रख्यात अभिनेता सलमान खानलाही धमक्या देताना दिसतो. 12 ऑक्टोबरला बिश्नोई गँगच्या शूटर्सनी तर सलमानचा जवळचा मित्र असलेले, प्रख्यात राजकारणी सिद्दीकी यांची निर्घृण हत्याही केली. तेव्हापासूनच तो पुन्हा चर्चेत आलाय. त्यानंतर आता लॉरेन्स बिश्नोईच्या अडचणी आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. गोल्डी ब्रारनंतर आता लॉरेन्सचा भाऊ गँगस्टर अनमोल बिश्नोईवर कडक कारवाई करण्यात आली आहे. NIAने अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेने अनमोल बिश्नोईला मोस्ट वाँटेड घोषित केले आहे. NIAने ने अनमोल बिश्नोईचा ‘मोस्ट वॉन्टेड’ यादीत समावेश केला आहे. तसेच त्याच्यावर 10 लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातही अनमोलचे नाव पुढे आले आहे.
खरं तर, NIAने कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईबद्दल माहिती देणाऱ्याला 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. ‘भानू’ या नावाने ओळखला जाणारा अनमोल बिश्नोई हा बनावट पासपोर्टच्या आधारे भारतातून पळून गेला होता. गेल्या वर्षी तो केनियात तर यावर्षी कॅनडामध्ये दिसला होता.
सिद्धू मूसावालाच्या हत्येतही हात
विख्यात पंजाबी गायक सिद्धू मूसावाला याची 2022 साली गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्या हत्येतही अनमोल बिश्नोईचा हात होता असा आरोप आहे. त्याच्याविरोधात 18 गुन्हे दाखल आहेत. यावर्षी अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घराबाहेर 14 एप्रिल रोजी गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी लूकआउट सर्क्युलर जारी केले होते. या गोळीबाराची जबाबदारी अनमोल बिश्नोईने सोशल मीडियावर घेतली होती.
सिद्दीकींच्या मारेकऱ्यांशीही अनमोलचा होता संपर्क ?
12 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची त्यांच्या मुलाच्या, आमदार झिशान सिद्दीकीच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. अनमोल बिश्नोई त्या शूटर्सच्याही संपर्कात होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अनमोल बिश्नोई आरोपीच्या थेट संपर्कात होता. कॅनडा आणि अमेरिकेतून काम करत असताना आरोपीच्या संपर्कात राहण्यासाठी तो स्नॅपचॅट या सोशल मीडिया ॲपचा वापर करत होता, असे पोलिसांनी सांगितले.
या सोशल मीडिया ॲप द्वारे अनमोलने बाबा सिद्दीकी यांचा मुलगा , आमदार झिशान सिद्दीकी याचा फोटोही शूटर्ससोबत शेअर केला होता, अशी माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दीकी यांचे अभिनेता सलमान खानशी जवळचे संबंध आणि त्यांचे दाऊद इब्राहिम सारख्या अंडरवर्ल्ड व्यक्तींशी असलेल्या कथित संबंधांमुळे त्यांनी सिद्दिकीला लक्ष्य केले असा दावा बिश्नोई गँगच्या सदस्याने फेसबुक पोस्टद्वारे केला होता. बाबा सिद्दिकीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 11 जणांना अटक केली असून त्यात दोन शूटर आणि शस्त्रास्त्र पुरवणाऱ्या व्यक्तीचा समावेश आहे.