गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला, तरुणाच्या चौकशीत जे समोर आले त्यानंतर पोलीसही हैराण
तळोजा परिसरात अवैध धंदे सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सदर परिसरात छापेमारी केली. छापेमारीत पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
रवी खरात, नवी मुंबई : पासपोर्ट आणि व्हिसाशिवाय तळोजा भागात बेकायदेशीरीत्या वास्तव्यास असलेल्या आणि छुप्या पद्धतीने अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या नायजेरियन नागरिकाला पोलिसांनी अटक केली आहे. बोनिफेस ईमेनिके असे या नायजेरियन नागरिकाचे नाव आहे. नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने शुक्रवारी रात्री तळोजा भागातून आरोपीला अटक केली. या कारवाईत पोलिसांनी त्याच्याकडून 11 लाख 60 हजार रुपये किमतीचा 196 ग्रॅम वजनाचा (एमडी) मेथाक्युलॉनचा साठा जप्त केला. याआधीही आरोपीला अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी अटक केली होती.
पोलिसांनी छापेमारी करत आरोपीला बेड्या ठोकल्या
तळोजा सेक्टर-2 मधील श्रीकृपा रेसिडेन्सी इमारतीत राहणारा नायजेरियन नागरिक येथे एमडी या अंमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी रात्री अंमली पदार्थ विरोधी कक्षाने छापा मारला. यावेळी बोनिफेस इमेनिके हा झटापट करून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याजवळ असलेली प्लास्टिकची पिशवी तपासली असता त्यात मेथाक्युलॉन या अंमली पदार्थाचा साठा आढळला. पोलिसांनी हा साठा जप्त केला.
आरोपी भारतात बेकायदेशीर वास्तव्य करत असल्याचे निष्पन्न
पोलिसांच्या चौकशीत त्याने हा साठा ओम्बोना पॉल या दुसऱ्या एका नायजेरियन व्यक्तीकडून घेतल्याची माहिती पोलिसांना दिली. तसेच त्याच्याकडे पासपोर्ट आणि व्हिसा नसतानाही तो गेल्या 3-4 महिन्यांपासून येथे वास्तव्य करून अंमली पदार्थांची विक्री करत होता, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी बोनिफेस ईमेनिके विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
वर्षभरापूर्वीच आरोपीला झाली होती अटक
बोनिफेस इमेनिके या नायजेरीयन नागरिकाला वर्षभरापूर्वी ठाणे पोलिसांनी मुंब्रा येथून अंमली पदार्थांच्या तस्करीत अटक केली होती. तो काही महिन्यांपूर्वीच कारागृहातून सुटला आहे. त्याने पुन्हा तळोजा येथून अंमली पदार्थाच्या तस्करीला सुरुवात केली होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्याला एमडी या अंमली पदार्थासह अटक करण्यात आली आहे.