सोशल मीडियावर लाईक आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी तरुणांचा कारनामा पाहून सर्वच हैराण, काय घडले नक्की?
सोशल मीडियावर लाईक्स आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी तरुणाने नको ते केलं आणि अमेरिकेपासून नोएडापर्यंत एकच राडा झाला. पोलीस घरी पोहचले तर तरुण आरामात झोपला होता.
नोएडा : सोशल मीडियावर लाईक्स आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी आजकालची तरुणाई काय करेल याचा नेम नाही. कधी कधी तरुणांचे रील्सचे वेड सर्वांसाठीच डोकेदुखी होऊन बसते. अशीच एक घटना नोएडात उघडकीस आली आहे. या रील्समुळे अमेरिकेपासून नोएडापर्यंत एकच गोंधळ उडाला. नोएडातील 20 वर्षाच्या तरुणाने रील्स बनवून पोलिसांसह सोशल मीडिया युझर्सची झोपच उडवून दिली. अखेर तांत्रिक तापासाच्या आधारे पोलिसांनी तरुणाचा शोध घेत त्याला अटक केली आहे. या तरुणाने फेसबुकवर लाईक्स आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी आत्महत्या करणारी पोस्ट टाकली होती. तरुणाला ही रील्स बनवणे चांगलेच महागात पडले आहे.
तरुणाने सोशल मीडियावर पोस्ट टाकताच एकच खळबळ
तरुणाने सोशल मीडियावर पोस्ट टाकत आत्महत्या केल्याचा दावा केला. ही बातमी पाहता पाहता जगभरातील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाली. अमेरिकेतील फेसबुकच्या मेटावर ही बातमी मिळताच, मेटाच्या टीमने भारत सरकारला याची माहिती दिली. त्यानंतर हा तरुण नोएडामध्ये कुठेतरी राहतो हे कळले, त्यामुळे नोएडाच्या सोशल मीडिया सेल आणि फेज-2 पोलीस स्टेशनने तरुणाचा शोध सुरू केला.
तरुणाचा शोध घेताना पोलिसांची तारांबळ
पोलिसांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सोशल मीडिया सेलतर्फे सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नजर ठेवण्यात येत होती. 26 एप्रिलच्या रात्री उशिरा रात्री 12:45 च्या सुमारास, सोशल मीडिया सेलला डीजीपी मुख्यालयाच्या मीडिया सेलकडून एक व्हिडिओ आणि मोबाइल नंबर प्राप्त झाला. व्हिडिओमध्ये 20 वर्षांचा एक तरुण हातात बाटली घेऊन औषध प्राशन करत होता.
हा व्हिडीओ आणि मोबाईल क्रमांक हाती लागताच सोशल मीडिया सेलने त्वरित कारवाई करत मोबाईल क्रमांकाचे लोकेशन ट्रेस केले. मोबाईलचे लोकेशन सेक्टर-87 च्या आसपास असल्याचे आढळून आले. त्यावर सोशल मीडिया सेल टीमने तत्काळ फेज-2 पोलीस स्टेशन प्रभारी यांना माहिती दिली. रात्री उशिरा पोलीस स्टेशन फेज 2 च्या पोलिसांनी अथक परिश्रमानंतर आजूबाजूच्या 50 हून अधिक लोकांकडून माहिती घेऊन युवकाच्या घरी दाखल झाले.
पोलीस तरुणाच्या घरी पोहचले असता तो झोपला होता
पोलिसांनी तरुणाच्या घरावर छापा टाकला असता हा तरुण घरात झोपला होता. फेसबुकवर लाइक्स आणि फॉलोअर्स वाढवण्याच्या उद्देशाने या मुलाने रील्स बनवताना ऑलआऊट प्राशन करताना एक व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर पोस्ट केला. वास्तविक या ऑलआऊटच्या बॉटलमध्ये पाणी भरण्यात आले होते. फेज-2 चे पोलीस स्टेशन प्रभारी यांनी सदर तरुणाचे समुपदेशन करत त्याला समजावले. यानंतर त्याची वैद्यकीय चाचणी करून त्याला सुखरूप त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.