मुंबई: तिला नवरात्रोत्सवात गरब्याच्या तालावर ठेका धरायचा होता. पण नवरा तिला रात्रीच्यावेळी गरबा खेळण्यासाठी पाठवायला तयार नव्हता. नवऱ्याच्या या सततच्या जाचाला ती कंटाळली होती. अखेर तिने नवऱ्याविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी ‘अभयम’ हेल्पलाइनला फोन केला. अखेर अभयम संस्थेच्या समुपदेशकांनी नवरा-बायको दोघांसोबत चर्चा केली. त्यांचं समुपदेशन केलं. बायकोवर विश्वास ठेवण्यासाठी नवऱ्याची समजूत काढली.
पत्नी कर्जाची परतफेड करत होती
या प्रकरणात नवऱ्याचा आयुर्वेदिक औषधांचा व्यवसाय आहे. त्याने एका माणसाकडून 30 हजार रुपये कर्ज घेतलं होतं. पण तो कर्जाची परतफेड करु शकला नाही. म्हणून या व्यक्तीच्या पत्नीने नोकरी सुरु केली. नवऱ्ंयाने ज्या माणसाकडून कर्ज घेतलं होतं, पत्नी तिच्या मिळकतीतून त्या कर्जाची परतफेड करत होती. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं.
बायकोवर लक्ष ठेवण्यासाठी घरी राहिला
“नवऱ्याच्या मनात त्यावरुन संशय निर्माण झाला. पत्नी त्या व्यक्तीच कर्ज चुकवत होती. त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याच्या संशयाने नवऱ्याच्या मनात घर केलं. त्याने नोकरी सोडली व बायकोवर लक्ष ठेवण्यासाठी तो घरी रहायला लागला” अभयमच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
त्यानंतर बायकोला परवानगी दिली
या जोडप्याला 14 वर्षांचा मुलगा आहे. त्यांच्यात वेगवेळ्या मुद्यावरुन भांडण सुरु झाली. नवरात्रीमध्ये तो बायकोला बाहेर जाऊ देत नव्हता. बायको दुसऱ्या कोणाच्या प्रेमात पडेल, अशी भिती त्याच्या मनात होती. आमच्या समुपदेशकांनी नवरा-बायको दोघांशी चर्चा केली. नवऱ्याची समजूत काढली. त्यानंतर त्याने बायकोला यावर्षी गरब्यासाठी परवानगी दिली. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.