VIDEO : शेतकऱ्याकडून 3 हजारांची लाच मागणारा अधिकारी कॅमेऱ्यात कैद, बुलडाण्यातील धक्कादायक घटना
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत मिळालेल्या विहिरीचे काम पूर्ण केल्यावर त्याचे बिल काढण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्याकडून सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्याने 3 हजारांची लाच मागणी केल्याचा प्रकार मोताळा पंचायत समितीमध्ये उघडकीस आला आहे.
बुलडाणा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत मिळालेल्या विहिरीचे काम पूर्ण केल्यावर त्याचे बिल काढण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्याकडून सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्याने 3 हजारांची लाच मागणी केल्याचा प्रकार मोताळा पंचायत समितीमध्ये उघडकीस आला आहे. लाभार्थी शेतकऱ्यानेच पैसे मागण्याचा हा धक्कादायक व्हिडीओ काढून त्याची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली. विशेष म्हणजे तक्रार करुन 20 दिवसांचा कालावधी उलटला तरीही यावर कारवाई झालेली नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी अशा लाचखोर अधिकाऱ्याला का पाठीशी घालत आहेत? असा प्रश्न निर्माण होतोय.
कागदपत्रे जमा करुनही बिल काढले नाही
मोताळा तालुक्यातील सारोळा पीर येथील शेतकरी वासुदेव चव्हाण यांना चार वर्षांपूर्वी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची विहीर मंजूर झालेली होती. चव्हाण यांनी मंजूर विहिरीचे खोदकामही केले. मात्र त्याचे पहिले बिल काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे विभागातील सहायक कार्यक्रम अधिकारी किरण खिल्लारे यांच्याकडे वर्षभरापूर्वी जमा केली. त्याला वर्ष उलटले तरीही पहिले बिल त्यांनी काढले नाही. अधिकारी खिलारे हे शेतकऱ्याकडून जीएसटीचे बिल मागत होते.
शेतकऱ्याकडून 3 हजाराची मागणी
आता विहीर खोदकामचे दुसरेही बिल खिल्लारे यांनी काढले नाही. आताही जीएसटीचे बिल मागत आहेत. शेतकऱ्याने त्याचे कारण विचारले असता सहाय्यक कार्यक्रम अधिकारी खिल्लारे यांनी 3 हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर बिल निघेल असे सांगितले, नाहीतर जीएसटीचे बिल आणून द्या, असे सांगितले.
अधिकाऱ्याची मुजोरी कॅमेऱ्यात कैद
शेतकरी वासुदेव चव्हाण यांनी वारंवार विनंती करुनही खिल्लारे यांनी बिलाची फाईल वरिष्ठांकडे पाठविले नाही. तसेच बिलही काढले नाही. मग त्रस्त शेतकरी चव्हाण यांनी सापळा रचून अधिकारी खिल्लारे यांचा पैसे मागतानाचा व्हिडीओ काढला. त्यावेळी शेतकरी 500 रुपये द्यायला तयार होते. मात्र लाचखोर अधिकारी खिल्लारे हे 3 हजारांवर अडून बसले होते.
अखेर शेतकऱ्याकडून पैसे घेतलेच
अखेर तुमच्याकडून काय होईल ते करा, असे अधिकारी उद्धटपने शेतकऱ्याला बोलला. यातील काही पैसे वरिष्ठांकडे अडचणी आल्यावर द्यावे लागतात, असेही तो म्हणाले. नंतर शेतकऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे व्हिडीओसह तक्रार केली. तक्रार करण्याला 20 दिवसांचा कालावधी उलटला तरीही अधिकारी खिल्लारेंवर कोणतीच कारवाई झाली नाही. विशेष म्हणजे खिल्लारे यांनी तरीही लाभार्थी शेतकऱ्याकडून 2 हजार रुपये घेतलेच.
यासंदर्भात मोताळा पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता ते कॅमेऱ्यासमोर बोलायलाही तयार नाहीत. शिवाय आपल्याला यासंदर्भात माहिती नसल्याचा आव आणत होते. त्यांनी आपण वरिष्ठांकडे याचा अहवाल पाठविला असल्याचे सांगितलं. मात्र आपले नाव त्या व्हिडीओमध्ये नसून आपणच एसीबीला तक्रार करा, असा सल्लाही त्यांनी दिला.
संबंधित घटनेचा व्हिडीओ बघा :
शेतकरीकडून लाच मागणारा अधिकारी कॅमेरात कैद #BULDHANA pic.twitter.com/szMCFNQwwG
— CHETAN PATIL (@chetanpatil1313) September 1, 2021
हेही वाचा :
19 वर्षीय तरुणीच्या सोनोग्राफीचा बहाणा, बीडमधील ‘नगराध्यक्ष’ डॉक्टरने अश्लील चाळे केल्याचा आरोप
पुणे एसीबीची धडक कारवाई! महापालिकेत लाचखोरांची संख्या जास्त तर महसूल विभागात सर्वाधिक कारवाया