Sushil Kumar | हाणामारीत पैलवानाचा मृत्यू, ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारचा पोलिसांना शोध
पैलवान सुशील कुमार, अजय, सोनू, सागर, प्रिन्स आणि अमित यांच्यासह अनेकांमध्ये ही प्राणघातक हाणामारी झाली होती. (Wrestler Sushil Kumar Sagar Murder)
नवी दिल्ली : ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार (Sushil Kumar) याचा दिल्ली पोलिस शोध घेत आहेत. दिल्लीतील मॉडल टाऊन भागातील छत्रसाल स्टेडियमवर पैलवानांच्या दोन गटात हाणामारी झाली होती. यामध्ये पाच पैलवानांना गंभीर दुखापत झाली होती. त्यापैकी सागर नावाच्या 23 वर्षीय पैलवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी दाखल आरोपपत्रात पैलवान सुशील कुमार याचेही नाव असल्याची माहिती आहे. (Olympics Medalist Wrestler Sushil Kumar named In FIR over Sagar Murder at Delhi Stadium)
प्रत्यक्षदर्शीच्या जबाबानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल करुन तपास सुरु केला आहे. पैलवान सुशील कुमार, अजय, सोनू, सागर, प्रिन्स आणि अमित यांच्यासह अनेकांमध्ये ही प्राणघातक हाणामारी झाली होती. एफआयआरमध्ये सुशील कुमारचंही नाव असल्याने त्याच्यासह बाकी आरोपींचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलीस छापेमारी करत आहेत. सुशील कुमार सापडल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा होईल, असं पोलिस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
मालमत्तेवरुन दोन गटांमध्ये तुफान हाणामारी
मयत पैलवान सागर हा आपल्या मित्रांसोबत छत्रसाल स्टेडियमजवळील मॉडल टाऊन परिसरातील एका घरात राहत होता. मालमत्तेवरुन मंगळवारी मध्यरात्री दोन गटांमध्ये तुफान हाणामारी आणि गोळीबारही झाल्याचा आरोप आहे. जखमी पैलवानांपैकी सागरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर इतर जखमी आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरुन स्कॉर्पिओ कार आणि बंदूक मिळाली आहे. त्यासोबतच पोलिसांनी जिवंत काडतुसंही जप्त केली आहेत. याआधीही पैलवानांच्या गटात प्रॉपर्टीवरुन वाद झाल्याची माहिती आहे.
सुशील कुमारचे स्पष्टीकरण काय?
“ते आमचे पैलवान नव्हते, मंगळवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला. आम्ही पोलिस अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे की काही अनोळखी व्यक्तींनी आमच्या आवारात उडी मारुन भांडण केले. आमच्या स्टेडियमचा या घटनेशी काही संबंध नाही” असा दावा कुस्तीपटू सुशील कुमार याने काल एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना केला होता.
They weren’t our wrestlers, it happened late last night. We have informed police officials that some unknown people jump into our premises and fought. No connection of our stadium with this incident: Wrestler Sushil Kumar on an incident of brawl
(File pic) pic.twitter.com/qBtS9FiTiL
— ANI (@ANI) May 5, 2021
(Wrestler Sushil Kumar Sagar Murder)
कोण आहे सुशील कुमार?
सुशील कुमार हा भारताकडून दोन वेळा वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारा एकमेव अॅथलीट आहे. 37 वर्षीय सुशील कुमारने 2012 च्या लंडन ऑलिम्पिक्समध्ये रौप्य, तर 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिक्समध्ये कांस्य पदक पटकावलं होतं. 2008 मध्ये सुशील कुमारने जिंकलेलं पदक हे खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिक्समध्ये कुस्ती प्रकारात भारताने पटकवलेलं दुसरं पदक होतं. त्याला 2009 मध्ये राजीव गांधी खेलरत्न या सर्वोच्च क्रीडा सन्मानाने गौरवण्यात आलं होतं.
संबंधित बातम्या :
आयपीएल स्थगितीच्या घोषणेनंतर शोएब म्हणतो, ‘मी पहिल्यांदाच BCCI ला सांगितलं होतं…’
आयपीएल स्थगित होताच रियान परागचं ट्विट, नेटकऱ्यांकडून टीकेचा भडीमार, पण ट्विटमध्ये नेमकं काय?
(Olympics Medalist Wrestler Sushil Kumar named In FIR over Sagar Murder at Delhi Stadium)