रस्ता अचानक नदीसारखा का झाला? मासे पकडण्यासाठी नागरिकांची झुंबड, काय घडलं नेमकं?
नगर-कल्याण महामार्गावर आळेफाटा येथे गतीरोधकाचा अंदाज न आल्याने मासे घेऊन जाणारा टेम्पो पलटला. यावेळी टेम्पोतील मारे महामार्गावर पडले आणि मासे गोळा करण्यासाठी नगारिकांनी एकच गर्दी केली.
जुन्नर / सुनील थिगळे : जुन्नर तालुक्यातील नगर-कल्याण महामार्गावर रात्रीच्या सुमारास आळे येथे एक वेगळं चित्र पहायला मिळालं. रस्त्यावर अक्षरश मासे तरंगत असल्याने नागरिकांसह प्रवाशांची एकच गर्दी झाली. शिरूर येथील तलावातून मासे टेम्पोमधून मध्य प्रदेशकडे नगर-कल्याण महामार्गाने जात असताना आळे कॉलेज येथे गतीरोधाकाचा अंदाज न आल्याने टेम्पो पलटला. यावेळी माशांनी भरलेले थर्माकॉलच्या खोक्यांमध्ये असलेले मासे रस्त्यावर परसले. रस्त्यावर मासे पडले असल्याची माहिती मिळताच आसपासच्या नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
मासे गोळा करण्यासाठी नागरिक आणि एकच झुंबड
हे सर्व मासे प्रतिबंधित मांगूर प्रजातीचे असल्याची प्राथमिक माहिती मिळते. रस्यावर माशांचा खच झाल्याने नागरिकांसह प्रवाशांची एकच गर्दी झाली होती. माशांसोबत थर्माकॉलच्या खोक्यांमधील पाणीही रस्त्यावर साचल्याने मासे त्यात तरंगत होते. हे मासे पकडण्यासाठी लोकांनी मोठी झुंबड उडाली. मात्र नंतर हे मासे प्रतिबंधित मांगूर प्रजातीचे असल्याने खाण्यासाठी योग्य नसल्याचे लक्षात येताच पुन्हा माझे महामार्गावर टाकून देण्यात आले.
अपघातामुळे आळेफाट्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत
या अपघातामुळे आळेफाट्याकडे जाणारी वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली होती. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत अनेक जण रस्त्यावर पडलेले मासे उचलताना दिसत आहेत. मात्र याबाबत आळेफाटा पोलिसांकडून या घटनेला पुष्टी मिळालेली नाही. रात्री उशिरा रस्त्यावरील मासे गाडीत भरून वाहन निघून गेले.