Satara Firing : सातारा महामार्गावर अज्ञाताकडून गोळीबार, घटनेत एकाचा जागीच मृत्यू
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाढे फाटा नजीक असणाऱ्या एका पानटपरी जवळ रात्री एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत शुक्रवार पेठ येथील रहिवासी असलेले अमित भोसले यांची अज्ञात दोन व्यक्तींनी डोक्यात गोळी झाडून हत्या केली.
सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाढे गावच्या हद्दीत एका हॉटेलजवळ अज्ञात कारणातून एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना आज उघडकीस आली आहे. हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले आहेत. अमित भोसले असे हत्या करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि सातारा तालुका पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी दहा पथके तयार केली आहेत.
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर घडली घटना
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाढे फाटा नजीक असणाऱ्या एका पानटपरी जवळ रात्री एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत शुक्रवार पेठ येथील रहिवासी असलेले अमित भोसले यांची अज्ञात दोन व्यक्तींनी डोक्यात गोळी झाडून हत्या केली.
नाश्ता करण्यासाठी एका टपरीजवळ थांबले असता गोळीबार
अमित भोसले हे रात्री एक वाजण्याच्या सुमारास महामार्गावर असणाऱ्या एका टपरीवर नाश्ता करण्यासाठी थांबले होते. यावेळी आधीच दबा धरुन बसलेल्या दोन आरोपींनी त्यांच्यावर चार राऊंड फायर केले. यानंतर अज्ञात आरोपी दुचाकीवरुन पळून गेले.
याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
भोसले यांची हत्या नेमक्या कोणत्या कारणातून झाली हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. आरोपींना अटक केल्यानंतरच ही हत्या नेमकी कुणी आणि कोणत्या कारणातून केली हे स्पष्ट होईल.