डॉक्टर दाम्पत्याच्या घटस्फोटाचा खटला, वकील मेव्हण्यावर जीवघेणा हल्ला, डॉक्टर पतीसह तिघे पसार
वकील प्रथमेश मोहिते यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्या प्रकरणी डॉ अरुण मोरे यांच्यासह 3 जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे
उस्मानाबाद : न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यामधील वकीलपत्र सोडून दे, अन्यथा जीव घेऊ, अशी धमकी देत उस्मानाबादमध्ये वकिलावर डॉक्टरने जीवघेणा हल्ला केला. वकील प्रथमेश मोहिते यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्या प्रकरणी डॉ अरुण मोरे यांच्यासह 3 जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मोहिते हे डॉ. मोरेंचे मेहुणे असल्याची माहिती आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉ मोरे आणि त्यांचे 2 साथीदार हल्लेखोर फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. वकिलावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी उस्मानाबाद येथील वकील संघटनेने या घटनेचा निषेध व्यक्त करत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
काय आहे प्रकरण?
उस्मानाबाद येथील वकील प्रथमेश सौदागर मोहिते हे घटस्फोट खटला लढण्यासाठी न्यायालयात हजर होते. त्यांच्यासोबत पक्षकार डॉ. कांचन मोरे यादेखील हजर होत्या. खटला संपल्यानंतर वकील प्रथमेश मोहिते हे आपली गाडी घेऊन घराच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी कोर्टाच्या आवारात घटस्फोट खटल्यात प्रतिवादी असलेले डॉ अरुण मोरे आणि त्यांचे दोन सहकारी आले.
नेमकं काय घडलं?
वकील मोहिते यांना खटल्यातील वकीलपत्र मागे घे असे सांगत तिघे धमकावत होते. त्यानंतर मोहिते हे घरी जात असताना त्यांना आपल्या गाडीचा पाठलाग होत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर आरोपी हे गाडीजवळ येताच त्यांनी गाडीत असलेले वकील प्रथमेश मोहिते यांच्यावर हल्ला चढवला.
मोहितेंच्या तोंडाला जबर दुखापत
हल्ल्यात प्रथेमश मोहिते यांच्या तोंडाला जबर दुखापत झाली असून गाडीवर दगड फेकून मारल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. मोहिते यांना तात्काळ जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आनंदनगर पोलीस ठाणे येथे भारतीय दंड संहिता कलम 307, 341, 506, 109, 427, 34 च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी डॉ. अरुण मोरे आणि त्यांचे दोन सहकारी हे फरार असून पोलीस त्यांचा अटकेसाठी प्रयत्न करत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे करत आहेत. सदर घटनेमुळे मात्र वकिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
डॉक्टर दाम्पत्याच्या घटस्फोटाचा खटला
मारहाण आणि हल्ला प्रकरणातील आरोपी डॉ अरुण मोरे आणि त्यांची पत्नी डॉ कांचन मोरे यांच्यात घटस्फोटचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून ते कोर्टात सुनावणीसाठी प्रलंबित आहे. या प्रकरणाची कोर्टात सुनावणी झाल्यावर या घटस्फोट प्रकरणातील डॉ कांचन मोरे यांचे वकील व नात्याने बंधू असलेले प्रथमेश मोहिते यांना कोर्ट आवारात शिवीगाळ धमकी देण्यात आली व नंतर त्यांच्यावर हल्ला करून गंभीर मारहाण केली.
संबंधित बातम्या :
बहिणीला मारहाण करणाऱ्या भाऊजींशी झटापट, चाकू खुपसून मेहुण्याने जीव घेतला
कुर्हाडीने वार करुन तरुणाची हत्या, संशयित मेहुणा पसार
(Osmanabad Advocate allegedly attacked by Doctor brother in law)