PFI चे पाकिस्तान कनेक्शन उघड; महाराष्ट्रातून समोर आली धक्कादायक अपडेट
पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. यानंतर पुणे पोलिसांनी कोंढवा परिसरातून 6 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
नवी दिल्ली : पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणाबाजीनंतर चांगलाच वाद पेटला आहे. त्यातच आता पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया(Popular Front of India) अर्थात PFI संघटनेबाबत महाराष्ट्रातून धक्कादायक अपडेट समोर आली आहे. PFI चे पाकिस्तान कनेक्शन उघड झाले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि दहशतवाद विरोधी पथक तसेच स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने धाडसत्र राबवण्यात आले. देशातील 8 राज्यांमधून 247 जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. यानंतर पुणे पोलिसांनी कोंढवा परिसरातून 6 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
तपासादरम्यान पीएफआयचे पाकिस्तान कनेक्शनही उघड झाले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या मोबाईलमध्ये 50 हून अधिक पाकिस्तानी नंबर सापडले आहेत.
संशयित आरोपी अनेकदा पाकिस्तानात गेल्याचेही समोर आले आहे. पीएफआयचा जनरल सेक्रेटरी अब्दुल खालिदच्या मोबाईल तपासला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अब्दुल खालिद भाऊ मोहम्मद महमूदही 6 वेळा पाकिस्तानला गेला आहे. तपास यंत्रणा मोहम्मद मेहमूदचा शोध घेत आहे. महाराष्ट्रातही पीएफआयचे नेटवर्क अनेक जिल्ह्यांमध्ये पसरल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे.
महाराष्ट्रात 50 ते 55 ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. पीएफआयने दुसऱ्यांदा केलेल्या छापेमारीत गुजरात, आसाम, कर्नाटक, मध्यप्रदेश राज्यात धरपकड मोहिम राबविली गेली.
अमरावती, पुणे, ठाणे, मुंबई, अहमदनगर, जालना, नांदेड, कल्याण, परभणी पुणे आदी ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयही पीएफआयच्या टार्गेटवर असल्याची माहिती उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र मोठं धाडसत्र राबवण्यात आले.
औरंगाबादमध्ये एटीएस आणि औरंगाबाद पोलिसांनी मोठी कारवाई करताना पीएफआयच्या आणखी 13 ते 14 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
जालना जिल्ह्यामध्ये पीएफआयचा माजी जिल्हाध्यक्षाला ताब्यात घेतले आहे. सोलापूरमधून एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
नांदेड येथील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या आबेद अली मोहंमद अली खानला ताब्यात घेण्यात आले आहे. नगर शहरातून आणि संगमनेरमधून प्रत्येकी एकाला ताब्यात घेण्यात आले.
कल्याणमधील पीएफआय कार्यकर्ता फरदीन पैकरला कल्याणच्या बाजारपेठ पोलिस आणि ठाणे खंडणी विरोधी पथकाने संयुक्त कारवाईं करत ताब्यात घेतले आहे. तर, विदर्भातील अमरावती आणि बुलडाण्यातही धाडसत्र राबवत संशयीतांना ताब्यात घेण्यात आले.