सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या गोल्डन मॅन ला अटक, गोल्डन मॅनने असा कोणता गुन्हा केला?
येवल्याचे सहाय्यक निबंधक प्रताप पाडवी यांच्या फिर्यादीवरुन पंकज पारख यांच्या संस्थेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पारख यांच्यासह एकूण 17 जणांवर अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : गोल्डन शर्ट वरुन संपूर्ण देशभर चर्चेत आलेले गोल्डन मॅन पंकज पगार (Pankaj Pagar) यांना नाशिकच्या ग्रामीण (Nashik Police) पोलीसांनी अटक केली आहे. पंकज सुभाष पारख (Golden Man) यांना नाशिकच्या येवला पोलीसांनी एका गुन्ह्यात अटक केली असून त्यांचा तब्बल 22 कोटी रुपयांच्या अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकज पारख यांच्यासह 17 संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकमध्ये तिकडे कॉलनी परीसारत कारमधून जात असतांना त्यांना अटक करण्यात आली असून जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कै. सुभाषचंद्र पारख नागरी सहकारी पतसंस्थेतील २२ कोटी रुपयांच्या अपहाराप्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल करत ही कारवाई केली आहे.
नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात कै. सुभाषचंद्र पारख नागरी सहकारी पतसंस्था आहे. गोल्डन मॅन पंकज पारख हे त्या संस्थेचे संस्थापक संचालक आहे. याशिवाय येवल्याचे ते माजी नगराध्यक्ष आहेत.
येवल्याचे सहाय्यक निबंधक प्रताप पाडवी यांच्या फिर्यादीवरुन पंकज पारख यांच्या संस्थेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पारख यांच्यासह एकूण 17 जणांवर अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोल्डन मॅन पंकज पारख हा गेल्या चौदा महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर नाशिक ग्रामीण पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्याला एका कारमधून जात असतांना अटक केली आहे.
कै. पारख संस्थेच्या अपहार गुन्ह्यातील काही संशयित आरोपीही फरार आहे. नाशिक ग्रामीण पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेची पथके त्यांच्या मागावर असून त्यांचा शोध घेतला जात आहे.
पारख यांच्या संस्थेने हजारो ठेवीदारांकडून 70 कोटी रुपयांच्या ठेवी स्वीकारल्या होत्या, याच ठेवीच्या माध्यमातून कर्जवाटप करणे आणि ठेवी सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी पतसंस्थेची होती.
परंतु संस्थेच्या संचालक मंडळासह अध्यक्ष आणि इतरांनी नियमबाह्य काम करून कर्जवाटप केले, त्यामुळे ठेवी परत करण्यास अडचणी आल्या आणि त्यामुळे संस्था अडचणीत सापडल्याने संचालक मंडळ बरखास्त झाले.
त्यानंतर पतसंस्थेवर प्रशासकाची नेमणूक झाली, त्यांनी चौकशी केल्यानंतर गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्याने प्रशासक प्रताप पाडवी यांनी तक्रार दिली आणि त्यावरून गुन्हा दाखल झाला होता.
सोन्याचा शर्ट घालणारा म्हणून पंकज पारखची ओळख आहे. तो येवल्याचा माजी नगराध्यक्ष आहे. कापड व्यावसायिक देखील आहे. संपूर्ण कुटुंब व्यावसायिक आणि राजकीय क्षेत्रात असल्याने मोठ्या प्रमाणात पैसा होता. त्यामुळे त्याने चार किलो सोन्याचा शर्ट बनविला होता.