काय चाललंय काय ? थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलिसच खेळत होते जुगार, ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
जे पोलिस जुगार खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करतात, त्यांनाच जुगार खेळताना रंगेहात अटक करण्यात आल्याने जिल्हाभरात चर्चा रंगली आहे.
नजीर खान , टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, परभणी | 27 ऑक्टोबर 2023 : जुगार खेळणं हा गुन्हा आहे. त्याच्या नादाला लागून अनेकांच आयुष्य उद्ध्वस्त होतं. भावी पिढीचंही या व्यसनामुळे भविष्य खराब होऊ शकतं. हे टाळण्यासाठी पोलिस अनेकवेळेस पोलिस जुगार अड्ड्यांवर (Gambling) कारवाई करत असतात. मात्र परभणीमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
तिथे चक्क पोलीस कर्मचारीच जुगार खेळताना सापडले. आणि तेही जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातच. पोलिसांचा हा प्रताप समोर आल्याने एकच खळबळ माजली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयातीलच एका खोलीत हा जुगाराचा डाव रंगला होता. मात्र या घटनेची माहिती मिळताच स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक तिथे दाखल झाल्या आणि त्यांनी थेट कारवाई केली. याप्रकरणी मोंढा पोलीस ठाण्यात 7 पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जे पोलिस जुगार खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करतात, त्यांनाच जुगार खेळताना रंगेहात अटक करण्यात आल्याने जिल्हाभरात चर्चा रंगली आहे.
रेस्ट रूममध्ये सर्रास रंगला होता जुगार
मिळालेल्या माहितीनुसार, परभणी पोलीस दलातील 7 पोलीस कर्मचाऱ्यांकडून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातच जुगार खेळण्याचा प्रताप समोर आला आहे. पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या परिसरातच असलेल्या रेस्ट रूममध्ये हा जुगार सर्रासपणे सुरू होता. जिल्हा पोलीस दलातील पाच पोलीस कर्मचारी तसेच, लाच लुचपत विभागाचा एक कर्मचारी आणि महामार्ग पोलिसात कार्यरत असलेला एक कर्मचारी असे सात जण मिळून जुगार खेळत होते.
मात्र जुगाराचा हा डाव कार्यालयातील एका खोलीत सुरू असल्याची माहिती मिळताच स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक रागसुधा आर थेट स्पॉटवर दाखल झाल्या, आणि कारवाई करत 5 हजार रूपयांचा मुद्देमाल स्पॉटवरून जप्त केले. कठोर शिस्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या परभणीच्या या अधिक्षकांनी संबंधित घटना समजल्यानंतर आपल्याच कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करायलाही मागेपुढे पाहिलं नाही. जुगार खेळणाऱ्या सातही जणांना त्यांनी मोंढा पोलिसांच्या स्वाधीन केले आणि त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेशही दिले.
याप्रकरणी मोंढा पोलीस ठाण्यात 7 पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात 12 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व कर्मचाऱ्यांची कसून चौकशी करण्यात येईल आणि चौकशीअंती या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची, पोलिसांची प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी कठोर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.