Parbhani : सहलीला निघालेल्या स्कूल बसचा अपघात! पालकांच्या काळजाचा ठोका चुकला
भीषण अपघात! एसटी आणि स्कूल बसची समोरासमोर धडक, विद्यार्थ्यांच्या सहलीला गालबोट
परभणी : परभणीच्या गंगाखेड-राणीसावरगाव मार्गावर भीषण अपघात झाला. सहलीला निघालेल्या विद्यार्थ्यांची बस एसटी बसला समोरुन धडकली. या मध्ये दोन्ही बसचा दर्शनी भाग पूर्णपणे चेपला. या भीषण अपघातानंतर विद्यार्थ्यांची घाबरगुंडी उडाली होती. या दुर्दैवी घटनेत 20 पेक्षा अधिक जण जखमी झाले. तर 4 ते 5 गंभीर जखमींना परभणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर इतरांना गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.
संत जनाबाई विद्यालय, गंगाखेड येथील शाळेची बस ही विद्यार्थ्यांना घेऊन सहलीला निघाली होती. चाकूर येथे सहलीला जात असताना विद्यार्थ्यांच्या सहलीच्या प्रवासाला गालबोट लागलं.
परभणी येथील गंगाखेड-राणीसावरगाव जवळ स्कूल आणि एसटी समोरसमोर आल्या. दोन्ही अपघातग्रस्त बसची अवस्थात पाहून ही धडक किती भीषण होती, याची कल्पना करता येऊ शकेल. या अपघातामध्ये दोन्ही बसच्या समोरील बाजूचं प्रचंड नुकसान झालं. एसटी बस आणि स्कूल बस एकमेकांमध्ये घुसल्या होत्या. यात दोन्ही बसच्या काचा फुटल्या. तर दोन्ही बसचे चालकही गंभीर जखमी झाले.
या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी बचावकार्य करण्यास सुरुवात केली. त्यानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाआखल करण्यात आलं.
या अपघातामुळे गंगाखेड-राणीसावरगाव मार्गावरील वाहतूकदेखील काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी वेळीच अपघातग्रस्त वाहनं हटवून या मार्गावर विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांचा काळजाचा ठोका चुकला. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे थोडक्यात निभावलं. शाळेतील शिक्षकही या अपघातामुळे चांगलेच धास्तावले होते.
स्कूल बसचा अपघात होण्याची ही काही पहिलीच घटना नव्हती. या आधाही अनेकदा स्कूल बसचे अपघात झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी रायगडमध्ये एक स्कूल बस दरीत कोसळली होती. या अपघातात 10 पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झाले होते. मात्र कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. त्यानंतर आता परभणीतही स्कूल बसचा भीषण अपघात झालाय.