Pune Crime : ‘स्पा’च्या नावाखाली नको ते उद्योग, डमी ग्राहक बनून पोलिस आले अन्.. रॅकेटचा पर्दाफाश
पिंपरी चिंचवडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. 'स्पा'च्या नावाखाली देहविक्रय करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. अनैतिक वाहतूक प्रतिबंधक विभागाने छापा टाकून ही कारवाई केली असून चार तरुणींची सुटका करण्यात आली.
पिंपरी चिंचवड | 19 मार्च 2024 : पिंपरी चिंचवडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘स्पा’च्या नावाखाली देहविक्रय करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. अनैतिक वाहतूक प्रतिबंधक विभागाने छापा टाकून ही कारवाई केली असून चार तरुणींची सुटका करण्यात आली. ज्या ‘स्पा’मध्ये छापा टाकण्यात आला होता, तेथील मॅनेजरला ताब्यात घेण्यात आला आहे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
डमी ग्राहक बनून केला पर्दाफाश
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडीतील फीनिक्स स्पा वर ही कारवाई करण्यात आली. निगडी येथे इन्स्पिरिया मॉलमध्ये फीनिक्स नावाने सुरू असलेल्या स्पामध्ये देहविक्री व्यवसाय केला जात असल्याची माहिती अनैतिक वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहविक्री व्यवसाय करून घेतला जात होता. यासंदर्भात खबऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी एक प्लान रचला.
पोलिसांनी त्यांचाच एक माणूस डमी ग्राहक बनवून फिनिक्स स्पामध्ये पाठवला, तेथे विचारपूस करून, तिथे देहविक्री व्यवसाय केला जातो का याची माहिती काढली, शहानिशा करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून स्पावर छापा टाकला. या स्पामधून चार तरूणींची सुटका करण्यात आली. त्यांना पैशांचे आमिष दाखवून देहविक्री करण्यास भाग पाडण्यात आले होते. या प्रकरणी स्पाच्या महिला मॅनेजरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र फरार आरोपी दिनेश गुप्ता याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.