नागपूर / सुनील ढगे : नागपूरच्या कळमना मार्केट परिसरात धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. एका हमालाकडून देशी कट्टासह सात जिवंत काडतूस जप्त करण्यात गुन्हे शाखा पोलिसांना यश आलं आहे. हा व्यक्ती मार्केटमध्ये हमाली करण्याच काम करतो, मात्र त्याच्याकडे देशी कट्टा कुठून आला याचा पोलीस शोध घेत आहेत. नागपुरात गुन्हेगारीच्या घटना बघता पोलीस याचा तपास सतर्कतेने करताना दिसतात आहेत. सात जिवंत काडतूस आणि देशी कट्टा मिळाल्याने खळबळ माजली आहे.
मार्केटमध्ये हमालीचे काम करणाऱ्या झलेंद्र लोधी नावाच्या इसमाकडे एक देशी कट्टा असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्याने आपल्याकडे देशी कट्टा असल्याचं कबूल केलं. यानंतर पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता देशी कट्टासह सात जिवंत काडतुस सुद्धा त्याच्या घरी मिळून आले.
हे सर्व कुठून आले अशी त्याच्याकडे विचारणा केली असता आग्र्याच्या एका व्यापाऱ्याने आपल्याला ठेवायला दिले असल्याचं त्याने सांगितलं. सध्या तरी लोधीवर कुठले गुन्हे दाखल नसले तरी पोलीस हा कट्टा याच्याकडे कसा आला आणि खरंच कोणी ठेवायला दिला का याचा शोध घेत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील मुंबई गोवा महामार्गलगत असणाऱ्या भरणे गावात एक घरात 80 हून अधिक घातक गावठी बॉम्ब सापडले आहेत. या प्रकरणी कल्पेश जाधव या तरुणावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात खेडमधील पन्हाळजे गावात प्रमुख जिल्हा मार्गावरून जाणाऱ्या एसटी बसच्या टायर खाली गावठी बॉम्ब फुटला होता.
याप्रकरणाचा तपास करत असताना गावठी बॉम्ब मोठ्या संख्येत एक घरात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भरणे गावातील त्या घरावर धाड टाकत 80 हून अधिक घातक गावठी बॉम्ब ताब्यात घेतले आहेत.