चोरटा बेकरीत आला, चॉकलेट मागू लागला, संधी मिळताच महिलेचं मंगळसूत्र हिसकावलं, शेतातून पळून जात असताना पोलिसांनी घेरलं
कोरोची येथील बेकरीमध्ये चॉकलेट घेण्याच्या बहाण्याने महिलेचे मंगळसूत्र हिसकावून शेतातून पळून जाणाऱ्या एका आरोपीस थरारक पाठलाग करत नागरिक आणि पोलिसांनी पकडले आहे.
इचलकरंजी (कोल्हापूर) : कोरोची येथील बेकरीमध्ये चॉकलेट घेण्याच्या बहाण्याने महिलेचे मंगळसूत्र हिसकावून शेतातून पळून जाणाऱ्या एका आरोपीस थरारक पाठलाग करत नागरिक आणि पोलिसांनी पकडले आहे. अजय उर्फ सूरज पिरगौडा हुवन्नवर (वय 22) असं आरोपीचं नाव आहे. तो हातकणंगलेच्या कोरवी गल्लीत सध्या वास्तवासत होता. तसेच तो मूळचा कर्नाटकाच्या कोथळी इथला असल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. याबाबतची तक्रार 42 वर्षीय वैशाली विकास शिंदे यांनी शहापूर पोलीस ठाण्यात दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली यांचे कोरोचीत बेकरीचे दुकान आहे. त्यांच्या बेकरीत शनिवारी (23 ऑक्टोबर) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास आरोपी अजय हा आला. त्याने वैशालींना चॉकलेट देण्यास सांगितले. वैशाली या बरणीत हात घालून चॉकलेट देत असताना अजयने त्यांच्या गळ्यातील सुमारे 45 हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसडा मारुन पळून गेला. त्यावेळी वैशाली यांनी आरडाओरडा केला असता नागरिक आणि पेट्रोलिंगसाठी जात असलेल्या मोटरसायकलवरुन दोघा पोलिसांनी त्याचा पाठलाग केला.
पोलिसांनी आरोपीला कसं पकडलं
आरोपी मंगळसूत्र चोरुन शेतातून पळून जात असताना त्याला पोलिसांनी पकडून ताब्यात घेतले. यावेळी त्याची झडती घेतली असता मंगळसूत्र आढळून आले. दरम्यान, संशयित अजय हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर याआधी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी पोलिसांचे नागरिकांतून कौतुक केले जात आहेत. शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक असिफ सिराजभाई आणि आरिफ वडगावे यांनी मोटरसायकलवरुन शेतामध्ये जात थरारक पाठलाग करत संशयित अजयला पकडले. त्यांच्या या कामगिरीबाबत नागरिकात कौतुक होत आहे.
महाराष्ट्रात सोनसाखळी चोरांचा हैदोस
महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये सोनसाखळी चोरीच्या अनेक घटना समोर येत आहेत. दर महिन्यात अशा घटना घडतात. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या मुलुंडमध्ये सोनसाखळी चोरीच्या दोन घटना समोर आल्या होत्या. दुचाकीवरुन आलेल्या दोन जणांनी दोन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरल्या होत्या. तसेच काही महिन्यांपूर्वी डोंबिवलीत एका 80 वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न झाला होता. तसेच कल्याणमध्येही सकाळच्या वेळी कचरा टाकण्यासाठी गेलेल्या एका आजीच्या गळ्यातील सोनसाखळी अशाचप्रकारे चोरी करण्यात आली होती. तसेच वर्ध्यातही अशीच एक घटना समोर आली होती. एक आजीबाई आंगण झाडत असताना आरोपी तिथे आले. त्यांनी आजींच्या गळ्यातील चैन लांबवली, त्यानंतर ते पोबारा झाले होते. या अशा घटना वारंवार समोर येताना दिसत आहेत. आरोपींना पोलिसांचा कोणताही धाक नाही, असं या घटनांमधून दिसतं.
हेही वाचा :