माजी लष्करी अधिकाऱ्यांची लुटमार गँग, मिरची पूड फेकून लुटालूट; लुटीचा आकडा ऐकून…
धारदार हत्याराचा धाक दाखवून आणि डोळ्यात मिरचीपूड फेकून सोन्या-चांदीचे दागिने पोहोचवणाऱ्या कुरिअर व्हॅनचालकाला लुटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. चोरट्यांच्या या गँगने तब्बल 4 कोटी रुपयांचे दागिने लुटले होते. अखेर चौघांना अटक करण्यात आली. त्यामध्ये माजी लष्करी जवानाचाही समावेश होता.
शैलेश पुरोहित, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नाशिक | 25 जानेवारी 2024 : धारदार हत्याराचा धाक दाखवून आणि डोळ्यात मिरचीपूड फेकून सोन्या-चांदीचे दागिने पोहोचवणाऱ्या कुरिअर व्हॅनचालकाला लुटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. चोरट्यांच्या या गँगने तब्बल 4 कोटी रुपयांचे दागिने लुटले होते. अखेर या टोळीतील चार जणांना उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा येथून अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं.
तर तिघे अजून फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिस अजून आग्रा येथे तळ ठोकून आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे या टोळीत माजी लष्करी जवानांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या टोळीकडून १ ते दीड कोटी रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
गेल्या आठवड्यात बई आग्रा महामार्गावरील माणिकखांब गावाजवळ घोटी पोलिस ठाणे हद्दीत चोरीची ही घटना घडली होती. मुंबईच्या जय बजरंग कुरिअर सर्व्हिसेसच्या इको गाडीवर दरोडा घालण्यात आला. दोन वेगवेगळ्या कारमधून आलेल्या पाच ते सहा जणांनी ती गाडी लुटली होती. लुटलेल्या वाहनास एकाने पुढून तर एकाने मागून कार आडवी लावून वाहन अडवले होते. या दरोडेखोरांनी गाडीतील सर्वांना खाली उटरवून हत्याराचा धाक दाखवला आणि त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून त्यांना जायबंदी केले. त्यानंतर त्या व्हॅनमधील सुमारे चार कोटी रुपये किमतीचे सोनं-चांदीचे दागिने लुटून दरोडेखोर पसार झाले. याप्रकरणी कारचालक गोपालकुमार अशोककुमार रा. किरावली, आग्रा यांनी फिर्याद दाखल केली त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन चौघांना अटक केली. पण इतर तिघे अजून फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. या दरोडेखोरांना पकडल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.