वृद्धाला करोडपती होण्याचं स्वप्न दाखवून केली लाखोंची फसवणूक, दोघांना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
कोट्याधीश होण्याचे स्वप्न दाखवून एका वृद्धाची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे
शाहिद पठाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, गोंदिया | 11 नोव्हेंबर 2023 : आपल्याकडे भरपूर पैसा असावा, झटपट पैसा मिळावा, फार कष्ट करायला लागू नयेत असं बऱ्याच जणांना वाटतं. त्या लोभापायी लोकं काहीही करू शकतात. असेच कोट्याधीश होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका वृद्धाची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुप्तधन मिळवून देतो, करोडपती व्हाल असे स्वप्न दाखवून स्वत: लखपती होण्याची इच्छा पूर्ण करणाऱ्या मांत्रिकासह दोघांना अटक करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. गोकुल घागरू घेलोद ऊर्फ गोकुल वैद्य (वय 45) व गुड्डू गोकुल घेलोद (28, दोन्ही रा. वारंगी गाव, गोसावीनगर, बुट्टीबोरी, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. ग्यानिराम सादाराम उके (80) असे फसवणूक झालेल्या इसमाचे नाव आहे.
करोडपती व्हाल, दाखवलं स्वप्न आणि फसवलं
मिळालेल्या माहितीनुसार, ग्यानिराम सादाराम उके हे वृद्ध इसम गोंदिया जिल्ह्याचा देवरी तालुक्यातील खुर्शीपार येथे राहतात. त्यांना गुडघेदुखीचा त्रास असल्याने तो त्रास कमी होण्यासाठी औषधी कुठे मिळेल, अशी विचारणा त्यांनी नातेवाईकांकडे केली होती. तेव्हा त्या नातेवाईकांकडून उके यांना या मांत्रिकाचा नंबर मिळाला. नातेवाइकांच्या माध्यमातून गोकुल घागरू घेलोद ऊर्फ गोकुल वैद्य या मांत्रिकासोबत चांगलीच ओळख झाली. त्याच्याकडून ग्यानिराम उके यांनी गुडघेदुखीवरची औषधी घेतली. त्यात त्यांना आरामही मिळाला.
आरोपी गोकुल घागरू घेलोद ऊर्फ गोकुल वैद्य याने त्यांचा विश्वास संपादन करून आपला व्हिजिटिंग कार्डसुद्धा त्यांना दिले होते. त्यानंतर उके हे त्यांच्याकडे औषध घेण्यासाठी गेले तेव्हा, त्या मांत्रिकाने त्यांना तुझ्या घरी गुप्तधन आहे, ते तुला काढून देतो, असे सांगितले. त्यासाठी मी एका मित्राला घेऊन येतो, तू करोडपती होशील असे आमिष त्या मांत्रिकाने उके यांना दाखवले. उके यांनी त्याच्यावर विश्वास ठेऊन ते गुप्तधन काढण्यासाठी परवानगी दिली.
आरोपींनी त्यांच्याकडून 7 लाख रुपये लुटून गुप्तधनाच्या नावावर जमिनीतून काढलेल्या हंड्यातून विविध प्रकारच्या पितळेच्या मूर्ती काढल्या आणि त्यांची फसवणूक केली. या प्रकरणात दोन्ही आरोपींवर भादंविच्या कलम 420, 34 सहकलम 3 महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करणे व त्यांचे समूळ उच्चारण करण्याचे अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.