मुंबई | 11 सप्टेंबर 2023 : नोकरीच्या कामासंदर्भात गुंतवणूक करून तसेच बिटकॉइन्सच्या माध्यमातून भरपूर कमाई करण्याचे आमिष दाखवून मुंबईतील एका रहिवाशाची तब्बल ६.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका भामट्याला अटक (accused arreste) करण्यात आली आहे. रियाज असे त्या भामट्याचे नाव असून तो २६ वर्षांचा आहे. आत्तापर्यंत त्याने अशा अनेक नागरिकांची फसवणूक केल्याचेही समोर आले आहे. आरोपी रियाज हा एका टोळीला त्याचे बँक खाते वापरून घोटाळ्यांद्वारे लोकांकडून लुटलेले पैसे जमा करण्यासाठी मदत करत होता, अशी माहिती देखील मिळाली आहे.
ओशिवरा पोलिसांच्या सायबर टीमने दिलेल्या माहिती नुसार, लोकांची फसवणूक करणारी ही टोळी टेलिग्रॅम ॲपद्वारे त्यांच्याशी संपर्क साधायची. “लोकांना नोकरीच्या कामात गुंतवणूक करण्यासाठी आमिष दाखवण्यासाठी ते जपानचा IP ॲड्रेस वापरत असत,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणात रियाज या आरोपीला शुक्रवारी वरळी येथील त्याच्या भाड्याच्या घरातून अटक करण्यात आली.
1.36 कोटी रुपये गोठवले
पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत असून ,तपास पथकाने रियाझचे सुमारे 1.36 कोटी रुपये असलेले चालू खातेही (current account) गोठवले आहे. ” त्या टोळीने ज्या – ज्या लोकांना फसवले, त्यांचे हे पैसे असून ते सध्या रियाझच्या अकाऊंटमध्ये आहेत. त्या लोकांनी YouTube वर जाहिराती पाहून आणि सबस्क्रिप्शन घेण्याच्या बदल्यात दुप्पट रकमेची बिटकॉइन्सच्या कमवण्यासाठी ही गुंतवणूक केली होती,” असेही पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोणी दाखल केली तक्रार ?
पण हे प्रकरण नेमकं उजेडात कसं आलं, याची तक्रार कोणी केली ? मुंबईत राहणाऱ्या ३० वर्षीय इस्माईल शेख याला घोटाळेबाजांनी चुना लावला होता. अशी टास्क्स पूर्ण केल्यास पैसे मिळतील असे आमिष त्याला दाखवण्यात आले होते. मात्र शेख याने 30 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान जे टास्क्स करून पैसे कमावले होते ते त्याने गमावले.
‘ मला 150 रुपयांचे गिफ्ट मिळेल असं सांगणारा मेसेज मला मिळाल होता. त्यानंतर मला टेलिग्राम अकाऊंटवर ॲड करण्यात आले आणि माझ्या अकाऊंटच्या ई-वॉलेटमध्ये 150 रुपयेही जमा झाले. मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीवर माझा विश्वास बसल्यानंतर त्याने मला एक टास्क पूर्ण करण्यासाठी 5000 रुपये भरण्यास सांगितले. नंतप मला त्याबदल्यात 6,500 रुपये मिळालेसुद्धा. पण नंतर त्या व्यक्तीने मला जास्त रक्कम गुंतवण्यास सांगितले. जेणेकरुन मला बिटकॉइन्सच्या मोबदल्यात मोठी रक्कम मिळू शकेल,” असे शेखने त्याच्या तक्रारीत नमूद केले.
शेखने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यामध्ये डीसीपी कृष्णकांत उपाध्याय, वरिष्ठ निरीक्षक मोहन पाटील, निरीक्षक शिवाजी भांडवलकर, सहायक निरीक्षक दिगंबर कुरकुटे आणि कॉन्स्टेबल अशोक कोंडे यांचा तपास पथकात समावेश होता. या गुन्ह्यातील आरोपी असलेला रियाज हा विमानाने आसामला पळून जाण्याच्या तयारीतच होता, मात्र तेवढ्यात पोलिसांनी त्याला अटक केली. चौकशीदरम्यान रियाजने आपण लोकांची फसवणूक केल्याची कबुली दिली.