चपलेवरून लावला चोराचा छडा, लोकलमधून 2 लाखांचा फोन लंपास करणाऱ्याला पोलिसांनी केली अटक
लोकल ट्रेनमध्ये एका महिलेचा दोन लाखांचा फोन चोरीला गेला. पोलिसांनी केवळ चप्पलेवरून चोराचा शोध घेत फोन परत मिळवून दिला.
मुंबई : फक्त चपलांच्या बनावटीवरून रेल्वे पोलिसांना दोन लाख रुपयांच्या फोनच्या चोरीची (mobile theft) उकल करण्यात यश मिळाले. अलीकडेच एका महिला प्रवाशाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे थांबलेल्या ट्रेनमधून फोन चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली होती. तेव्हा गव्हर्नमेंट रेल्वे पोलिस (जीआरपी) कडे तपासासाठी फक्त काही लीड्स होत्या. संशयित आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता पण त्याचा चेहरा अस्पष्ट ( blur image) दिसत होता. मात्र पोलिसांनी अनोख शक्कल लढवत त्याला ताब्यात घेतले. चोराची चालण्याची लकब आणि चप्पल (footwear) यावरून या चोराचा छडा पोलिसांनी लावत त्याला गजाआड केले.
हेमराज बन्सीवाल (30) असे आरोपीचे नाव असून त्याला फोनची खरी किंमत माहीत नव्हती, त्यामुळे त्याने दोन लाखांचा फन अवघ्या 3500 रुपयांत त्याच्या मित्राला फोन विकला होता. पोलिसांनी त्याचा मित्र देवीलाल चौहान (३२) यालाही अटक केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर येथे जाणाऱ्या लोकलमध्ये एक महिला फर्स्ट क्लासच्या डब्यात बसली आणि फोन तिने बाजूला ठेवला. उतरताना तिच्या लक्षात आले की तिच्याकडे फोन नाहीये. ती ज्या सीटवर बसली होती तेथे ती परत गेली असता फोन तेथेही नव्हता. फोन चोरीला गेल्याचे महिलेच्या लक्षात आल्यावर तिने थेट पोलिसांत धाव घेत मोबाइल चोरीची तक्रार नोंदवली. तब्बल २ लाख रुपये किमतीचा हा फोन चोरी झाल्याने ती चांगलीच घाबरली होती. ही घटना २५ मे रोजी घडली.
असा लागला चोराचा शोध
दरम्यान, रेल्वे पोलिसांनी तपासची चक्रे फिरवली. रेल्वे पोलिसांनी स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक जण लोकलच्या महिलांच्या डब्यात चढत असल्याचे दिसले. दरम्यान, या व्यक्तीचा चेहरा सीसीटीव्हीत नीट दिसत नव्हता. मात्र ती व्यक्ती सीएसएमटी स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडली.
तेव्हा पोलिसांनी शक्कल लढवली. त्यांनी त्या व्यक्तीच्या पायातील चप्पल आणि त्याची चालण्याची लकब हेरून ठेवली. ज्या महिलेचा फोन हरवला होता ती सकाळी साडेअकरा वाजताच्या लोकल ट्रेनने सीएसएमटी स्थानकात उतरली होती. त्यामुळे पोलिसांनी दुसऱ्या दिवसापासून त्या वेळेत येणाऱ्या लोकल ट्रेनमधील प्रवाशांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. तेव्हा पोलिसांना प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वर त्याच पद्धतीने चालणारी आणि तशाच चपला घातलेली एक व्यक्ती दिसली व्यक्ती दिसला. रेल्वे पोलिसांनी त्या व्यक्तीला लगेच ताब्यात घेत त्याची चौकशी केली. यानंतर त्याने दोन दिवसांपूर्वी ट्रेनमधील मोबाईल फोन चोरल्याची कबुली दिली.
महागडा फोन पाहून हाव सुटली
हेमराज असे त्याचे नाव असून त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तो प्लॅटफॉर्म पार करण्यासाठी एका ट्रेनमधून दुसऱ्या बाजूला जात असतांना त्याला महिलांच्या डब्यात एका सीटवर फोन पडलेला दिसला. हा फोन अतिशय महागडा असल्याचे त्याला कळले. पैशांची हाव निर्माण झाल्याने त्याने तो फोन चोरला. दरम्यान, घरभाडं देण्यासाठी आणि धान्य भरण्यासाठी त्याने अवघ्या ३५०० रुपयांना हा फोन विकल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.