पैशाच्या हिशोबारून वाद झाला अन् गोळी सुटली, दोन तरुणांचा जीव गेला; शिवसेनेचा ठाण्यातील माजी नगरसेवक ताब्यात
पाटण तालुक्यातील गुरेघर येथे काल रात्री झालेल्या गोळीबारात दोन जण ठार झाले. याप्रकरणी संशयित मदन कदम याला ताब्यात घेण्यात आलं आहे. मदन यानेच हा गोळीबार केल्याचं सांगितलं जात आहे.
सातारा : साताऱ्याच्या पाटण येथे काल रात्री झालेल्या गोळीबारात दोन तरुण ठार झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण पाटण तालुका हादरून गेला आहे. या हत्येची माहिती कळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. या प्रकरणी पोलिसांनी ठाण्यातील शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे माजी संपर्क प्रमुख मदन कदम यांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी मदन कदम यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. कदम यांना आज कोर्टात हजर केलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. कदम यांना अटक करण्यात आल्याने पाटण तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पाटण तालुक्यातील गुरेघर येथील मोरणा भागात रविवारी रात्री संशयित मदन कदम यांनी केलेल्या गोळीबारात दोन जण ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला. मदन कदम हे मूळचे पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथील आहे. ते ठाणे महानगरपालिकेचा माजी नगरसेवक आहेत. तसेच शिवसेनेचे माजी संपर्क प्रमुखही आहेत. मदन कदम यांनी केलेल्या गोळीबारात श्रीरंग लक्ष्मण जाधव आणि सतीश बाळासाहेब जाधव या दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. हे दोन्ही तरूण कोरडे वाडी पाटण येथील रहिवासी आहेत. त्यामुळे पोलिसांनी कदम यांना ताब्यात घेतलं आहे.
वाद झाला अन् गोळी सुटली
पवनचक्कीच्या पैशाच्या जुन्या वादावरून हा गोळीबार झाल्याचं सांगितलं जातं. जुना वाद मिटवण्याची चर्चा सुरू असताना पुन्हा वादावादी झाली आणि त्यातच रागाच्या भरात मदन कदम याने गोळीबार केला. त्यात या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मदन यांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर पाटण तालुक्यात तणाव निर्माण झाला आहे.
गावकऱ्यांचा घराला वेढा
काल रात्री साडे दहा पावणे अकराच्या सुमारास ही घटना घडली. गोळीबार केल्यानंतर मदन याने घटनास्थळावरून काढता पाय घेतला. मात्र, या घटनेची माहिती मिळताच मोरणा खोऱ्यातील गुरेघर धरण परिसरातील गावकऱ्यांनी मदन कदम याच्या घराला वेढा घातला. यावेळी गावकऱ्यांनी जोरजोरात घोषणाबाजी केली. मदन याला ताब्यात देण्याची मागणी केली. तसेच काही लोकांनी मदन याच्या घरात घुसण्याचाही प्रयत्न केला. पण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गावकऱ्यांना समजावले आणि त्यांना पांगवले.
शंभुराज देसाई यांचा कार्यकर्ता
दरम्यान, या गोळीबारात मृत्यू झालेला एक तरुण राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांचा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे देसाई यांचे कार्यकर्तेही संतापले आहेत. गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.