कल्याण / 20 जुलै 2023 : असं म्हणतात गुन्हेगार कितीही हुशार असला तरी कायद्यापुढे नाही. याचाच प्रत्यय कल्याणमधील एका प्रकरणात आला आहे. नोकराच्या हातून मालकांची बेकायदेशीर पिस्तुल हरवली. यामुळे रागाच्या भरात मालकांनी नोकराला जीवघेणी मारहाण केली. या मारहाणीत नोकराचा मृत्यू झाला होता. मात्र गेले नऊ महिने मालक पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करत होते. मात्र कायद्यापुढे कुणी मोठा नसतो. अखेर पोलिसांनी नऊ महिने अथक प्रयत्न करुन गुन्ह्याचा उलगडा केला. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. विजय पाटील आणि नितीन पाटील अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर संतोष सरकटे असे मयत नोकराचे नाव आहे.
आरोपी विजय पाटील आणि नितीन पाटील यांचा कल्याणमधील हेदूटणे गावात टँकरने पाणीपुरवठा करण्याचा व्यवसाय आहे. मयत संतोष सरकटे त्यांच्याकडे टँकर नोंदणीचं काम करायचा. आरोपी विजयने संतोषकडे त्याचे बेकायदेशीर पिस्तुल ठेवण्यास दिले होते. मात्र हे पिस्तुल त्याच्याकडून गहाळ झाले. संतोषने जाणीवपूर्वक हे पिस्तुल गहाळ केल्याचा आरोप करत आरोपींना त्याला आठ दिवस खोलीत कोंडून ठेवले. आठ दिवस त्याला बेदम मारहाण करण्यात येत होती. अखेर या मारहाणीमुळे संतोषचा ऑक्टोबर 2022 मध्ये मृत्यू झाला.
यानंतर आरोपींनी स्थानिक डॉक्टरकडून दारुच्या अतिसेवनामुळे संतोषचा मृत्यू झाल्याचे प्रमाणपत्र घेतले. मग घाईत नातेवाईकांसोबत संतोषचे इलेक्ट्रिक शवदाहिनीत अंत्यसंस्कार केले.
मात्र संतोषच्या नातेवाईकांना त्याची हत्या झाल्याचा संशय होता. यामुळे त्यांनी मानपाडा पोलिसांकडे चौकशीची मागणी केली. मात्र गेले नऊ महिने संतोषचे कुटुंबीय न्यायासाठी फिरत होते. अखेर नातेवाईकांनी दहा दिवसांपूर्वी कल्याण क्राईम ब्रँचकडे मागणी केली. यानंतर डोंबिवलीचे एसीपी सुनील कुराडे यांनी अखेर या प्रकरणाचा उलगडा केला.
नऊ महिन्यांपूर्वी घडलेल्या हत्याकांडाचा एसीपी सुनील कुराडे यांच्या पथकाने दहा दिवसात उलगडा केला. यानंतर पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे. तर तिसरा आरोपी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, मृत्यूचे प्रमाणपत्र देणारा डॉक्टरही पोलिसांच्या रडारवर आला आहे. पोलीस डॉक्टरचीही चौकशी करत आहेत.