लाखो रुपयांची रोकड पळवणाऱ्या तिघांना पकडण्यात पोलिसांना यश, चौकशीत कंपनीच्या कर्मचाऱ्याने…
crime news : व्यापाऱ्याला लुटणाऱ्या तिघांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश
अहमदनगर : अहमदनगरला (Ahmadnagar) व्यापाऱ्याला लुटणाऱ्या तीन भामट्यांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. तर त्यातील एक जण त्याच व्यापाऱ्याकडे हमाल म्हणून कामाला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या हमालासह त्याच्या दोन मित्रांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली केली आहे. तसेच या आरोपींकडून ७ लाख १० हजारांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके (Police katake) यांनी दिली. तिघांनाही गुप्त माहितीनूसार सापळा रचून खर्डा (kharda) येथे ताब्यात घेण्यात आलं आहे. मागच्या कित्येक दिवसांपासून त्यांचा शोध सुरु होता.
आडत व्यापारी दत्तात्रय कुंडल बिरंगळ यांचा गावातील शेतकऱ्यांचे धान्य खरेदी करून ते बार्शी येथे विक्री करण्याचा व्यावसाय आहे. ते विकलेल्या धान्याचे पैसे आणण्यासाठी १५ फेब्रुवारी २०२३ रोजी बार्शीला गेले होते. सोबत त्यांच्याकडे हमाल म्हणून काम करत असलेला गणेश कांबळे हा होता. हे दोघे मोटारसायकलवरून सायंकाळी सात वाजेच्या सुमारास गावी सोनेगावच्या दिशेने येत होते. पाठीमागून तोंडाला ३ बांधलेले दोघे जण मोटारसायकलवरून आले. त्यांनी बांबूच्या दांडक्याने बिरंगळ यांच्या डोक्यात मारले. त्यात ते जखमी झाले. त्यांच्याकडील पैशांची पिशवी घेऊन चोरटे पसार झाले. पिशवीत दहा लाख रुपये होते. याबाबत खर्डा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तेव्हापासून पोलिस चोरट्यांच्या मागावर होते. काही संशयित हालचाली पोलिसांच्या लक्षात आल्या होत्या, त्याचवेळी व्यापाऱ्याच्या कामगारावरती सुध्दा लक्ष ठेवण्यात आलं होतं. खबऱ्यांनी दिलेल्या माहितीची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी तिघांना खर्डा येथून ताब्यात घेतलं.