राहाता / अहमदनगर : नगर मनमाड महामार्गावर शिर्डी नजीक झालेल्या अवजड कंटेनर आणि कारमध्ये भीषण अपघाताची घटना आज उघडकीस आली. या अपघातात रयत शिक्षण संस्थेचे जेष्ठ प्राचार्य राजेंद्र बर्डे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात बर्डे यांच्या कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या घटनेत वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातात गंभीर जखमी बर्डे यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. राहाता येथील शारदा माध्यमिक विद्यालयाचे शिस्तप्रिय म्हणून ओळख असलेल्या प्राचार्य राजेंद्र बर्डे यांच्या निधनाने अहमदनगर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गुरुवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास साकुरी शिवारातून नगर मनमाड महामार्गावरून बर्डे हे स्वतःच्या अल्टो कारने राहाता येथे घराकडे चालले होते. यावेळी कार भरधाव वेगात असल्याने त्यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने कारने पुढे चाललेल्या कंटेनरला मागून जोराची धडक दिल्याने हा अपघात घडला.
या अपघातात कारचा चक्काचूर झाला. तर बर्डे यांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर तात्काळ त्यांना उपचारासाठी शिर्डी येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
राहाता शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक संकुलाचे तत्कालीन मुख्याध्यापक आणि तालुक्यातील चितळी येथील रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे बर्डे हे प्राचार्य होते.