शिर्डीत जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्याचा किळसवाणा प्रकार, महिला साईभक्ताला अश्लील फोटो-व्हिडीओ पाठवले
महिला साईभक्ताने जनसंपर्क विभागातील एका अधिकाऱ्याने फोनवर अश्लील फोटो तसेच व्हिडीओ पाठवल्याची लेखी तक्रार साईबाबा संस्थानकडे केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
शिर्डी (अहमदनगर) : महिला साईभक्ताने जनसंपर्क विभागातील एका अधिकाऱ्याने फोनवर अश्लील फोटो तसेच व्हिडीओ पाठवल्याची लेखी तक्रार साईबाबा संस्थानकडे केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महिला साईभक्ताच्या लेखी तक्रारीनंतर स्थानिक शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाली आहे. अशा प्रकारचे गैरकृत्य करणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या संघटक स्वाती परदेशी यांनी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
स्वाती परदेशी यांनी निवेदनात नेमकं काय म्हटलंय?
“श्री साईबाबा संस्थान हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ठिकाण आहे. जनसंपर्क कार्यालयात अनेक भाविक आरती आणि दर्शन पाससाठी येत असतात. आरती आणि दर्शनाच्या नावाखाली जनसंपर्क कार्यालयातील एका अधिकाऱ्याने मुंबई तसेच आसाम, गुवाहाटी येथील साईभक्त महिलांशी जवळीक तयार केली. नंतर मोबाईलवरुन अश्लिल चित्रफित आणि मेसेज पाठवले. या संदर्भात सदर महिलांनी संस्थानकडे लेखी तक्रार केली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन या महिलांना अश्लिल चित्र, फोटो पाठवल्या प्रकरणी संबधित जनसंपर्क कार्यालयातील अधिकाऱ्याची सखोल चौकशी व्हावी. तसेच या संदर्भात शहानिशा करुन संबधित अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी”, अशी मागणी स्वाती परदेशी यांनी साईबाबा संस्थानला निवेदनातून केली आहे.
संस्थानची भूमिका काय?
या निवेदनाची प्रत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच तदर्थ समितीचे अध्यक्ष प्रधान जिल्हा न्यायाधीश आणि अहमदनगरचे पोलीस प्रमुखांना पाठवण्यात आल्याचे परदेशी यांनी सांगितलं आहे. या प्रकरणावर शिर्डी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी सध्या तरी बोलण्यास नकार दिला आहे. दरम्यान, या प्रकरणी संबंधित महिला साईभक्तांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली नाही. त्यांनी साईबाबा संस्थानला लेखी तक्रार दिली आहे.
‘उत्तराखंडात महिला अत्याचारांवरील घटनांत दीडशे टक्क्याने वाढ’
दुसरीकडे देवभूमी अशी ओळख असलेल्या उत्तराखंडात देखील महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र पाठवले होते. या पत्रात मुख्यमंत्र्यांनी याबाबत उल्लेख केला होता. “उत्तराखंड ही तर देवभूमीच म्हणावी लागेल. आपण स्वतः या देवभूमीचे सुपूत्र आहात. मुख्यमंत्री म्हणून या राज्याचे नेतृत्व आपण केले आहे. उत्तराखंडच्या देवभूमीचा महिलांवरील अत्याचारांचा आलेख देखील चढता आहे. देवभूमीत महिलांवरील अत्याचारांत दीडशे टक्क्यांनी वाढ झाल्याचे सरकारी आकडेच सांगत आहेत. हरिद्वार, डेहराडूनसारख्या शहरांत महिलांवरील बलात्कार, हत्येचे गुन्हे सतत वाढत आहेत. हुंडाबळी, महिलांच्या अपहरणाचे गुन्हेही वाढत आहेत. यावर काय उपाय योजना करावी बरे? तेथेही विधिमंडळाचे खास सत्र बोलवू शकतो काय?”, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पत्राद्वारे केला होता.
हेही वाचा :
पाणी पिण्यासाठी थांबलेल्या महिलेच्या दुचाकीवर कारवाई, पुणे ट्रॅफिक पोलिसांचा अजब कारभार
पुण्यात वाहतूक पोलिसांचा उद्दामपणा, दुचाकीस्वाराला बाईकसकट उचलून टेम्पोत भरलं
दुचाकीस्वाराला बाईकसकट उचलून टोईंग व्हॅनमध्ये भरणं अंगलट, पोलीस निरीक्षकाबाबत ‘हे’ आदेश