अभिजित पोते, यवत, पुणे : भीमा नदीच्या (Bhima River) पात्रात एकाच कुटुंबातील ७ जणांचे मृतदेह (Dead bodies) आढळल्याने पुण्यात खळबळ माजली आहे. या भयंकर घटनेमागचं नेमकं कारण समोर आलं आहे. कुटुंबियांनी ही आत्महत्या केली असावी असा अंदाज आधी वर्तवण्यात आला होता. मात्र सखोल तपासाअंती (Investigation) पोलिसांनी या प्रकरणाचं गूढ उकललं आहे. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं उघड झालं आहे. कुटुंबियांच्या नातेवाईकांनीही हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता. विशेष म्हणजे या प्रकरणी आरोपींनी या घटनेची कबुलीही दिली आहे. आरोपींच्या भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हे हत्याकांड घडवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लवकरच पोलीस अधिकारी यासंदर्भात पत्रकार परिषद घेणार आहेत.
दौंड तालुक्यातील पारगाव येथील भीमा नदी पात्रात एकाच कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या नसून हत्या झाल्याचं कारण उघड झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना अटक केली असून त्यांनी या भयंकर कृत्याची कबुलीही दिली आहे. आरोपीच्या एका भावाचा काही दिवसांपूर्वी अपघातात मृत्यू झाला. हा अपघात सदर कुटुंबियांनी अंधश्रद्धा आणि करणीच्या माध्यमातून केल्याचा आरोप आरोपींनी केला आहे. त्याच रागातून संपूर्ण कुटुंबाची हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 17 जानेवारी रोजी रात्रीची आहे. 18 जानेवारी रोजी दौंड तालुक्यातील पारगाव येथील भीमेच्या पात्रात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर दोन पुरुष, अन्य एक महिला आणि तीन लहान मुलांचे मतृदेह 24 जानेवारीपर्यंत आढळले. या प्रकाराने पुणे ग्रामीण पोलिसही चक्रावून गेले. हा घातपात आहे की आत्महत्या याचा वेगाने तपास सुरु झाला. अखेर यामागील खरे कारण समोर आले आहे.
हे कुटुंब नेमकं कुठलं आहे, याची माहिती 24 जानेवारी रोजी पोलिसांनी दिली. मयत कुटुंबातील महिला व पुरुष बीड तसेच उस्मानाबाद येथील रहिवासी आहेत. मोहन पवार हे आपली पत्नी, मुलगी, जावई आणि तीन नातवंडांसोबत नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज गावात राहत होते. या घटनेत या सातही जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.