अभिजित पोते, यवत,पुणे : पुण्यातल्या दौंड (Daund) तालुक्यात घडलेल्या घटनेने सध्या जिल्ह्यात खळबळ माजली आहे. एकाच घरातल्या एकानंतर एक अशा 7 जणांचे मृतदेह (Dead body) भीमा नदीपात्रातून (Bhima River) बाहेर निघाले. 18 जानेवारी रोजी पहिला मृतदेह वर आला, त्यानंतर कालपर्यंत तब्बल सात जणांचे मृतदेह आढळले. हा अपघात आहे की घातपात याबाबत तपास सुरु होता. पोलीस तपासाअंती एक मोठं कारण समोर आलं आहे. सदर कुटुंबातल्या मोठ्या मुलाच्या प्रेम प्रकरणाच्या वादावरून संपूर्ण कुटुंबानंच हे धक्कादायक पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. तर ही आत्महत्या नसून हत्या असल्याचाही एक अँगल समोर आलाय.
शिरूर-चौफुला रोडवर असलेल्या दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीत भीमा नदीच्या पात्रात एकाच कुटुंबातल्या ७ जणांचे मृतदेह टप्प्या-टप्प्याने आढळले. यात दोन पुरुष, दोन महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १७ जानेवारीची असावी, असा अंदाज आहे. १८ जानेवारी रोजी सुरुवातीला एका महिलेचा मृतदेह आढळला. त्यानंतर २० जानेवारी रोजी एका पुरुषाचा तर २१ जानेवारीला आणखी एका पुरुषाचा मृतदेह आढळला. २२ जानेवारी रोजी आणखी एका महिलेचा मृतदेह आढळला. तर २४ जानेवारी रोजी तीन लहान मुलांचे मृतदेह आढळल्याने खळबळ माजली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर कुटुंब बीड आणि उस्मानाबाद येथील असल्याचं तपासाअंती समोर आलं. कुटुंबातले प्रमुख मोहन पवार हे पत्नी, मुलगी, जावई आणि तीन नातवंडांसोबत नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज गावात राहत होते. अहमदनगर येथे मोलमजुरी करून हे कुटुंब उदरनिर्वाह करत होते.
१७ जानेवारी रोजी रात्री ११ वाजेनंतर सर्व कुटुंबीय वाहनाने निघोज गावातून निघाले होते. पारगावच्या हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज आहे.
सदर घटनेमागे सामुहिक आत्महत्येचं कारण असल्याचं प्रथम दर्शनी समोर येतंय. कुटुंबातल्या मोठ्या मुलाच्या प्रेम प्रकरणातून सदर घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जातोय. सामाजिक प्रतिष्ठेला धक्का लागू नये, यामुळे कुटुंबियांनी स्वतःला नदीत झोकून दिले का, यासंबंधी पोलीस सखोल तपास करत आहेत. तर ही आत्महत्या नसून अंधश्रद्धेपोटी हत्या केली असावी, असाही संशय व्यक्त केला जातोय.