पुणे : रुग्णावर योग्य उपचार न झाल्यास त्याचा मृत्यू झाल्यानंतर डॉक्टररला मारहाण, रुग्णालयाची तोडफोड अशा प्रकारच्या घटना आजवर तुम्ही ऐकल्या असतील किंवा पहिल्या देखील असतील. पण, आपल्या पाळीव प्राण्यांवर योग्य उपचार न झाल्याने डॉक्टरला मारहाण आणि रुग्णालयाची तोडफोड झाल्याची घटना पुण्यातील हडफसर येथे घडली आहे. डॉग आणि कॅट क्लिनिकमध्ये ही तोडफोड करण्यात आली असून डॉ. रामनाथ ढगे यांना मारहाण झाली आहे. त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. त्यावरून हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हेटिरनरी डॅाक्टरला मारहाण झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून चार दिवसांपूर्वीही घटना घडली आहे. या घटनेची मात्र पुण्यात जोरदार चर्चा आहे.
पुण्यातील हडपसर परिसरातील मंत्री मार्केट येथे डॉग आणि कॅट क्लिनिक आहे, डॉ. रामनाथ ढगे हे क्लिनिकमध्ये काम पाहतात.
त्यांच्याकडे एक मांजर घेऊन एक महिला आणि चार अनोळखी व्यक्ती आले होते. आजारी असलेल्या मांजरावर उपचार करण्यासाठी ते आले होते.
दोन दिवस झाले मांजराने काहीही खाल्ले नसून त्यावर उपचार करण्यासाठी ते आले होते, मांजरावर उपचार सुरू करण्यात आले पण मांजराचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता.
मांजराला घेऊन आलेल्या व्यक्तींनी रागात डॉ. ढगे यांना जाब विचारण्यास सुरुवात केली, त्यावेळी मांजराचा झालेला मृत्यू पाहून संबंधित व्यक्तींनी शिवीगाळ आणि दमदाटी सुरू केली.
मांजर कसे झोपले तसेच तुला झोपवतो असे म्हणत डॉ. ढगे यांना मारहाण करण्यात आली, याशिवाय क्लिनिकची तोडफोडही करण्यात आली.
यामध्ये डॉ. ढगे यांच्या पायाला जबर मार लागला असून त्यांच्या तक्रारीवरुन मांजर प्रेमी असलेल्या महिला आणि इतर चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात मांजर पाळण्यासाठी काही नियम आहे, त्यानुसार परवानगी घ्यावी लागते, अनेक लोकं त्याचे पालनही करीत आहे, मांजरावरील प्रेम अनेकदा पुणेकरांकडून दिसून आले आहे.
त्यातच मांजरावरुण थेट मारहाण केल्याची ही घटना पहिलीच असल्याचे समोर आले असून येत्या काळात काय कारवाई होते हे बघणं महत्वाचे ठरणार आहे.