अपघातात दोघांचा जीव घेतला…आरोपीला शिक्षा काय तर निबंध लिहा; आणखी अटी कोणत्या ?
पुण्यात दारूच्या नशेत भरधाव वेगाने कार चालवत दोन व्यक्तींची हत्या करणाऱ्या अल्पवयीन व्यक्तीला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र त्यावेळी न्यायालयाने आरोपीला दिलेल्या शिक्षेचीही सध्या बरीच चर्चा होत आहे.
पुण्यात एका अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने आणि बेदरकारपणे कार चालवत दुचाकीला धडक दिली आणि दोघांचा जीव घेतला. या अपघातात जखमी झालेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तिच्या साथीदाराने रुग्णालयात उपचारांदरम्यान अखेरचा श्वास घेतला. या घटनेनंतर तेथील उपस्थित नागरिकांनी आरोपी ड्रायव्हरला पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी कार ड्रायव्हरविरोधात येरवडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. पुण्यातील या अपघातामुळे एकच खळबळ माजली. या घटनेतील आरोपीला अटक तर झाली पण अवघ्या काही तासांत त्याला जामीनही मिळाला. यामुळे एकच संताप व्यक्त होत आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे जामीन देताना न्यायालयाने त्याला दिलेल्या शिक्षेबद्दल सध्या चर्चा सुरू आहे.
दोघांचा जीव घेण्यास कारणीभूत ठरलेल्या त्या आरोपीला शिक्षा काय तर अपघात या विषयावर निबंध लिहा. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा अल्पवयीन आरोपी पुण्यातील प्रसिद्ध बिल्डरचा मुलगा असून या अपघाताकत मृत झालेले दोघे राजस्थानचे आहेत. या प्रकरणी अल्पवयीने आरोपी ॲड. प्रशांत पाटील यांच्यातर्फे जामीनासाठी अर्ज केला होता. कोर्टाने तो मंजूर करत त्याला काही अटींवर जामीन दिला.
काय आहे शिक्षा
दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या या मुलाला कोर्टाने ठोठावलेल्या शिक्षेची सध्या सर्वत्र चर्च सुरू आहे.
१) आरोपीला 15 दिवस येरवडा विभागातील पोलिसांसोबत ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी मदत करावी लागेल. तसेच वाहतूक जागृतीचे फलक रंगवावे लागतील
२) आरोपीला मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन उपचार घ्यावे लागतील.
३) भविष्यात आरोपीने कोणताही अपघात पाहिला तर त्याला सर्वप्रथम अपघात ग्रस्तांची मतद करावी लागेल. ४) रस्ते अपघाताचे परिणाम आणि त्यावरील उपाय या विष्यावर आरोपीला कमीत कमी 300 शब्दांचा निबंध लिहावा लागेल.
या अटींवर त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.
असा झाला अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत मृत्युमुखी पडलेले दोघे राजस्थानचे रहिवासी होते आणि ते जवळच्या पबमधून पार्टी करून परतत होते. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितल्यानुसार, रविवारी मध्यरात्री , “मी तेथे रिक्षा घेऊन उभा होतो. एक मुलगा आणि मुलगी बाईकवर येत होते आणि रस्ता ओलांडत असताना अचानक मागून भरधाव वेगाने आलेल्या एक पोर्श कारने त्यांच्या बाईकल धडक दिली आणि त्या दोघांना उडवले. त्या धडकेने ती मुलगी 10 फूट उंच उडाली आणि धाडकन खाली कोसळली. तर बरगड्या मोडल्यामुळे त्या मुलाला काहीच हालचाल करता येत नव्हती. त्या मुलीचा घटनास्थळीच मृृत्यू झाला तर मुलाचा हॉस्पिटलमध्ये उपचारांदरम्यान मृत्यू झाला. अपघातावेळी पोर्श कारमध्ये तीन मुले होती. त्यातील एकजण पळून गेला. स्थानिकांनी इतर दोघांना ताब्यात घेऊन चोप दिला आणि नंतर पोलिसांनी येऊन सर्वांना ताब्यात घेतले. तिघांनीही दारू प्यायली होती आणि अपघातावेळी गाडीचा वेग 200-240 च्या आसपास असावा.
चाचणी अहवाल येण्यापूर्वीच जामीन
अल्पवयीन आरोपी विरुद्ध आयपीसी कलम 304 (निष्काळजीपणा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी दारू पिऊन गाडी चालवत असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यासाठी त्याची रक्त तपासणी करण्यात आली. मात्र, या चाचणीचा अहवाल येण्यापूर्वीच न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर केला.