Pune Crime : सुसंस्कृत पुरोगामी पुण्यात जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार, पैशाचा पाऊस पाडण्यासाठी..
सुसंस्कृत, पुरोगामी पुण्यात जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पैशांचे आमिष दाखवून एका तरूणाला लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला. भोंदू बाबाने एका तरूणाची फसवणूक करत लाखो रुपये लुटले.
योगेश बोरसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 4 डिसेंबर 2023 : सांस्कृतिक शहर, विद्येचं माहेरघर अशी ओळखं असणारं पुणं… पण नुकत्याच घडलेल्या एका घटनेने मुळापासून हादरलं. सुसंस्कृत, पुरोगामी पुण्यात जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पैशांचे आमिष दाखवून एका तरूणाला लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला. भोंदू बाबाने एका तरूणाची फसवणूक करत लाखो रुपये लुटले. याप्रकरणी चौघांविरोधात हडपसर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस त्या भोंदू बाबासह आणखी तिघांचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर येथील ससाणे नगर परिसरात हा प्रकार घडला. विनोद छोटेलाल परदेशी असे फिर्यादीचे नाव आहे. त्याच्या एका मित्रामार्फत त्याची भोंदू बाबाशी ओळख झाली. पैशांचा पाऊस पाडतो असे सांगत त्या भोंदू बाबाने परदेशी यांना अघोरी पूजा मांडायला सांगितली. मात्र पूजा सुरू असतानाच तिथे अचानक काही बनावट पोलिस आले आणि त्यांना त्या भोंदू बाबाला आणि त्या तरूणाला बेदम मारहाण केली. तसेच तिथे ठेवलेले 18 लाख रुपये उचलून ते तिथून पसार झाले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच परदेशी यांनी याप्रकरणी हडपसर पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. त्यानंतर बाबा आईरा शॉब याच्यासह माधुरी मोरे रॉकी वैद्य आणि किशोर पंडागळे या चार जणांविरोधात पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. फसवणूक करणारा भोंदू बाबा आणि तिघांचा पोलिस कसून शोध घेत आहे.