Pune Crime : हद्द झाली आता ! क्रिकेट खेळण्यावरून राडा, थेट गोळीबारच केला..
पुण्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चक्क क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून दोन गटांत राडा झाला आणि त्याचे पर्यवसन हे गोळीबारात झाले.
पुणे | 21 मार्च 2024 : कुख्यात गुंड शरद मोहोळची दिवसाढवळ्या हत्या, त्यानंतर कोयता गँगचा हल्ला, एकतर्फी प्रेमातून दर्शना पवाहृर हिचा खून… गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातून फक्त गुन्ह्यांच्याच बऱ्याच घटना कानावर पडत आहेत. मात्र यामुळे सामान्य पुणेकर भयभीत झाले असून ते जीव मुठीत धरून जगत आहेत. हे सगळं कमी की काय म्हणून आता पुण्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चक्क क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून दोन गटांत राडा झाला आणि त्याचे पर्यवसन हे गोळीबारात झाल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील कात्रज भागात ही घटना घडली आहे. सुदैवानं गोळीबारात कोणी जखमी झालेलं नाही, मात्र तरीही नागरिक भयभीत झाले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला. कात्रज भागात राहत असलेल्या 2 गटातीतल तरूणांमध्ये मंगळवारी क्रिकेटची मॅच झाली. मात्र क्रिकेट खेळण्यावरून दोन गटांत वाद झाले. आणि हा वाद मिटवण्यासाठी या दोन्ही गटातील तरुण बुधवारी भेटले. त्यांच्यापैकी एका गटातील तरूण हा रेकॉर्ड वरचा गुन्हेगार होता. वाद मिटवण्यासाठी आलेल्या तरुणांमध्ये पुन्हा भांडण झाले आणि तो वाद टिपेला गेला. दरम्यान, या वेळी एका गटातील तरुणाने समोरच्या गटातील एका तरुणावर बंदूक ताणली आणि गोळी चालवली. मात्र सुदैवाने ती गोळी त्याला लागली नाही. गोळीबार होताच परिसरात पळापळ झाली आणि यावेळी २ तरुण जखमी झाले. या प्रकरणी काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास करण्यात येत आहे.