Pune Crime : पुण्यात चोरट्यांची दिवाळी जोरात, अनेक घरं फोडून लाखोंचा ऐवज लुटला
दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात देशभरात आणि राज्यभरात पार पडला. मात्र हीच दिवाळी पुण्यातील लोकांना फार महागात पडली. कारण या काळात पुण्यात अनेक ठिकाणी घरफोडीच्या, चोरीच्या घटना घडल्या आहेत.
पुणे | 20 नोव्हेंबर 2023 : दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात देशभरात आणि राज्यभरात पार पडला. मात्र हीच दिवाळी पुण्यातील लोकांना फार महागात पडली आहे. कारण या काळात पुण्यात अनेक ठिकाणी घरफोडीच्या, चोरीच्या घटना घडल्या आहेत. लाखोंचा ऐवज लुटला गेला आहे. ऐन दिवाळीत, बंद घर फोडून चोरट्यांनी हात साफ करत मुद्देमाल चोरल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे चोरट्यांची दिवाळी मात्र चांगलीच जोरात झाली आहे. चोरट्यांनी घातलेल्या या धुमाकूळामुळे सामान्य नागरिक मात्र बरेच धास्तावले आहेत.
शहराच्या विविध भागातील फ्लॅट्समधून सोन्याचे दागिने आणि रोकड असा लाखो रुपयांचा ऐवज चोरी केल्याच्या घटना घडल्या. दिवाळीत अनेक जण गावी किंवा बाहेर फिरायला जातात. त्यामुळे घरं बंद असतात. हीत संधी साधून चोरट्यांनी घरफोडी करून मौल्यवान वस्तू, दागिने, रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज चोरला.
केशवनगरमध्ये घरफोडीत 13लाखांचा ऐवज लुटून पोबारा
केशवनगरमधील एका फ्लॅटच्या दरवाज्याची कडी, कुलूप तोडून चोरट्यांनी पाच लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा सुमारे 12 लाख 90 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. 18 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास केशवनगरच्या मुंढवा परिसरात ही चोरी झाली. या प्रकरणी गोपाल झा (वय-३४, रा. गोपाळ कॉम्प्लेक्स, केशवनगर) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी गोपाळ झा यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूमधील कपाटातून चोरट्यांनी पाच लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा लाखोंचा ऐवज चोरी केला. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक संदीप जोरे हे पुढील तपास करत आहेत.
कर्वेनगरमध्येही घरफोडी करून लूट
तर कर्वेनगरमध्येही घरात घुसून चोरी झाली आहे. येथील एका फ्लॅटमधील कुलूप तोडून चोरटा आत घुसला आणि त्याने बेडरूमधील कपाटातून 30 हजारांची रोकड लंपास केली. ही घटना 17 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री कर्वेनगर परिसरात घडली. याबाबत प्रीतम रुद्रकुमार देवनाळ (वय 21) यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याआधारे पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून चोरांचा कसून शोध घेण्यात येत आहे.
सोमवार पेठेतही चोरांचा डल्ला
सोमवार पेठेतही चोरट्यांनी बंद घरं फोडून डल्ला मारला. येथील १५ ऑगस्ट चौकातील एका फ्लॅटमधून चोरट्यांनी चार लाख रुपयांचा ऐवज चोरी केला. या प्रकरणी एका 30 वर्षांच्या महिलेने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेची जैन मंदिराजवळ घरगुती खानावळ आहे. चोरट्याने कपाटातील लॉकरमधून चार लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करूत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.