Pune Crime : पुण्यात गुन्हेगारीचा कळस, चक्क पोलिसांवरच उचलला हात, येरवडामध्ये गदारोळ
राज्यात सध्या गुन्हेगारांचा हैदोस सुरू असून विद्येचं माहेरघर अशी ख्याती असलेल्या पुण्यातही गुन्हेगारांनी कळस गाठला आहे. येरवडा कारागृहातील कैद्यांनी अधिकाऱ्याला कारागृहातच बेदम मारहाण केली. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत.
अभिजीत पोते, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 15 फेब्रुवारी 2024 : राज्यात सध्या गुन्हेगारांचा हैदोस सुरू असून विद्येचं माहेरघर अशी ख्याती असलेल्या पुण्यातही गुन्हेगारांनी कळस गाठला आहे. महिन्याभरापूर्वीच पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळची दिवसाढवळ्या हत्या झाली. त्याचा तपास अजून सुरूच आहे. हे प्रकरण अजूनही थंडावलं नसतानाच पुण्यात आता गुन्हेगारांनी पुन्हा हैदोस घातला आहे. चक्क पोलिसावरच हात उचलून मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पुण्यातील येरवडा कारागृहात ही खळबळजनक घटना घडली आहे. येरवडा कारागृहातील कैद्यांनी चक्क तेथीच अधिकाऱ्याला कारागृहातच बेदम मारहाण केली. पठाण असे मारहाण झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. येरवडा कारागृहात असलेल्या कुख्यात आंदेकर टोळीतील आरोपींनी कारागृह अधिकाऱ्याला मारहाण केली. या मारहाणीत संबंधित अधिकारी गंभीर जखमी झाला आहे.