Pune Crime : Pune Crime : विक्रीसाठी विश्वासाने दागिने दिले पण.. कोट्यवधींचे दागिने घेऊन सेल्समन फरार

| Updated on: Nov 04, 2023 | 11:42 AM

व्यापाऱ्याने विक्रीसाठी सेल्समनकडे विश्वासाने दागिने सोपवले. मात्र बराच वेळ झाला तरी तो परत आलाच नाही. सगळीकडे शोध घेऊनही तो कुठे सापडला नाही.

Pune Crime : Pune Crime : विक्रीसाठी विश्वासाने दागिने दिले पण.. कोट्यवधींचे दागिने घेऊन सेल्समन फरार
Follow us on

योगेश बोरसे , टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 4 नोव्हेंबर 2023 : सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत. दिवाळी अवघ्या आठवड्याभरावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सराफा बाजारात, दागिन्यांच्या दुकानातही मोठी लगबग सुरू आहे. दागिने विक्रीसाठी मोठी झुंबड उडालेली दिसत आहे. मात्र त्याच दरम्यान पुण्यातील एका व्यापाऱ्याला मोठा फटका बसला आहे. विक्रीसाठी दिलेले कोट्यवधींचे दागिने घेऊन सेल्समन फरार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

विक्रम अमृतलाल बाफना असे संशयिताचे नाव असून तो मूळचा मुंबईचा रहिवासी असल्याचे समजते. या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात सेल्समनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्वासाने सोपवले दागिने पण त्यानेच दिला दगा…

मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र धनराज सोनीग्रा (वय ४५,रा. मॅरीगोल्ड बिल्डिंग, सॅलीसबरी पार्क, गुलटेकडी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सोनीग्रा यांचे पुण्यातील रविवार पेठेत सोनिग्रा ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. गेल्या अनेक पिढ्यांपासून त्यांचा हा व्यवसाय सुरू आहे. आरोपी विक्रम हा नोकरीच्या शोधात होता आणि ओळखीतून त्याला सोनीग्रा यांच्या दुकानात काम मिळाले. जुलै महिन्यापासून तो कामावर लागला होता.

सोनिग्रा यांच्या दुकानामध्ये विविध प्रकारचे सोन्याचे दागिने तयार करण्यात येतात आणि ते शहरातील विविध सराफा व्यावसायिकांकडे विक्रीसाठी पाठवण्यात येतात. १ ऑक्टोबर रोजी सोनिग्रा यांनी विविध दुकानांमध्ये विक्रीसाठी २४५ सोनसाखळ्या विक्रम बाफना याच्याकडे सोपवल्या.त्याची किंमत सुमारे एक कोटी १५ लाख ४२ हजार रुपये इतकी असल्याचे समजते. सोनिग्रा यांनी विश्वासाने दिलेले सोन्याचे ते दागिने घेऊन विक्रम दुकानातून निघाला. मात्र बराच वेळ उलटला तरी तो काही परत आला नाही. त्यामुळे सोनिग्रा यांनी त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली, इतर कामगारांनाही त्याच्या शोधार्थ पाठवले. तुमच्या दुकानात विक्रम दागिने विकण्यासाठी आला होता का, असेही त्यांनी अनेक दुकानांमध्ये जाऊन विचारले. पण तो कोणाकडेच न गेल्याने अखेर तो दागिने घेऊन फरार झाल्याचे सोनिग्रा यांच्या लक्षात आले.

त्यानंतर सोनिग्रा यांनी तातडीने फरासखाना पोलीस स्टेटशन गाठून सर्व प्रकार सांगत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला. आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.