Pune Crime : ज्वेलर्सचं दुकान लुटायला आले आणि अडकले, नागरिकांनी आवळल्या ५ दरोडेखोरांच्या मुसक्या
मंचर शहरातील एका ज्वेलर्सच्या दुकानात चोरी करून दरोडेखोर पळण्याच्या तयारीत होते. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे पाच चोरट्यांना मंचर पोलिसांनी ज्वेलर्सच्या छतावरच अटक केली. मात्र इतर दोघे हे अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरले.
सुनील ठिगळे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 8 नोव्हेंबर 2023 : उत्तमभाग्य ज्वेलर्सवर दरोडा टाकून लाखो रुपयांचे दागिने दरोडेखोरांनी लुटले. मात्र चोरी करून ते पळून जाण्याच्या तयारीत असतानाच नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी त्या चोरट्यांना अटक केली. एकूण पाच चोरट्यांना बेड्या ठोकण्यात आल्या असून त्यांच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. 7 पैकी 5 चोरट्यांना बेड्या ठोकण्यात आल्या मात्र अंधाराचा फायदा घेऊन दोन चोर हे पळून जाण्यात यशस्वी ठरले. मंचर पोलिसांनी बुधवारी पहाटेच्या सुमारास ही कारवाई केली आहे.
एक टीप मिळाली आणि...
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंचर शहरातील बाजारपेठेत भरवस्तीमध्ये उत्तम भाग्य ज्वेलर्स हे सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे दुकान आहे. त्या ज्वेलर्सच्या वरच्या मजल्यावर शंकास्पद हलचाली सूरू असल्याची टीप आज बुधवारी पहाटे 3.30 वाजता मंचर पोलिसांना मिळाली. ही टीप मिळताच रात्री गस्तीवर असणारे मंचर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक बळवंत मांडगे यांनी स्वतः एक पथक घेतले तसेच पोलीस उप निरीक्षक सोमशेखर शेटे यांनीही दुसरे पथक घेतले व ते घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांच्या पथकाने स्थानिक रहिवाशांनाही या घटनेची माहिती दिली आणि त्यांनाही सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यानंतर पोलिसांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने उत्तमभाग्य ज्वेलर्सच्या दुकानाला सर्व बाजूने वेढा दिला आणि त्यानंतर पोलीस हे त्या ज्वेलर्स दुकानाच्या छतावर गेले.
ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा घातल्यानंतर सात दरोडेखोर हे लुटीचा माल गोळा करून पळण्याच्या तयारीतच होते. मात्र तेवढ्यात पाच दरोडेखोरांना पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले. पण दोन चोरटे मात्र रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पळून गेले.
घटनास्थळावरून अटक करण्यात आलेल्या पाच दरोडेखोरांकडून पोलिसांनी सुमारे साडे सहा लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये 18 किलो 710 ग्राम चांदी, 2 लाख 22 हजार रुपयांची रोख रक्कम आणि 5 तोळे सोन्याचा समावेश आहे. तसेच चोरट्यांकडून कोयते, गॅस कटर व दरोड्यासाठी वापरण्यात येणारे इतर हत्यारे हस्तगत करण्यात आली आहेत. याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. खेड विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. तसेच पळून गेलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्यासोबत काही मुद्देमाल नेला आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
वैभव बाळू रोकडे (वय 24 रा. नागाचा खडक मुरबाड), गणेश रामचंद्र टोके(वय 26 रा. नडे ता. मुरबाड), अजय सखाराम भिसे ( वय20 रा. कलगाव ता. शहापूर) ग्यानसिंग भोला वर्मा (वय 23 रा. घोडबंदर रोड ठाणे) व मोहम्मद अरमान दर्जी (वय 23 रा. नेहरूनगर कुर्ला) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.