गुगलचं ऑफिस उडवून देण्याची धमकी, बॉम्ब ठेवल्याचा कॉल, अखेर सत्य समोर आलं…
हैदराबाद येथून या 45 वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलंय. ही व्यक्ती दारूच्या नशेत होती. त्याच अवस्थेत त्याने कॉल केल्याची माहिती पोलिसांना दिली.
अभिजित पोते, पुणेः गुगलच्या (Google)ऑफिसमध्ये बॉम्ब (Bomb) ठेवल्याच्या माहितीनंतर पुणे आणि मुंबई पोलिसांची (Mumbai Police) आज झोप उडवून दिली. पुण्यातील कोरेगाव पार्क येथील गूगल कंपनीच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याचा कॉल एका अज्ञात व्यक्तीने केला होता. मुंबईतील गूगल ऑफिसमध्ये यासंबंधीचा धमकीचा कॉल आला होता. त्यानंतर पोलिसांनी ताबडतोब सूत्रे हलवली. युद्ध तापळीवर तपास घेण्यात आला. बॉम्बशोध पथक सदर ठिकाणी पाठवण्यात आलं. मात्र तपासणीअंत तेथे कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. दरम्यान, माहिती देणाऱ्या व्यक्तीचाही तपास सुरु होता. फोन कॉलच्या डिटेल्सवरून या व्यक्तीची ओळख पटली. या तपासानंतर कुणीतरी खोडसाळपणा केल्याचं समोर आलं. फोन कॉल करणारी व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत होती. तर अन्य एका व्यक्तीचा बदला घेण्यासाठी त्याने असा फोन केल्याचं समोर आलंय.
काय घडला प्रकार?
मुंबई येथील बीकेसी कॉम्प्लेक्समधील गुगल इंडियाच्या कार्यालयात रविवारी रात्री यासंबंधीचा फोन आला. पुणे येथील कोरेगाव पार्क येथील गुगलच्या कार्यालयात बॉम्ब ठेवला असल्याची माहिती त्याने दिली. या माहितीवरून पोलिसांनी ताबडतोब पुणे पोलिसांशी संपर्क साधला. पुण्यातील बॉम्ब शोधक पथकाने गुगलच्या ऑफिसची तपासणी केली. मात्र तेथे कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. अखेर मुंबई पोलिसांना याबाबत कळवण्यात आलं.
हैदराबाद येथील व्यक्तीचा कॉल
पोलिसांनी तपास घेतला असता हैदराबाद येथील पणयम बाबू शिवानंद या व्यक्तीने कॉल केल्याचं उघडकीस आलं. हैदराबाद येथून या 45 वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलंय. ही व्यक्ती दारूच्या नशेत होती. त्याच अवस्थेत त्याने कॉल केल्याची माहिती पोलिसांना दिली.
भावाशी वाद सुरु होते..
सदर व्यक्तीचा भाऊ पुण्यात राहतो. तो कोरेगाव येथील गुगल कंपनीच्या कार्यालयात काम करतो. या दोघांमध्ये अनेक दिवसांपासून काही कारणास्तव वाद सुरु होते. याच गोष्टीचा राग मनात धरून सदर व्यक्तीने भावाला त्रास व्हावा म्हणून..दारूच्या नशेत थेट गुगलचे ऑफिस उडवून देण्याची धमकी दिली, असे कारण पोलिस तपासात समोर आले आहे.