Pune : पुण्यातील गुन्हेगारी काही थांबेना, कारचा धक्का लागल्याच्या वादातून तरूणाची हत्या
दिवसेंदिवस पुण्यातील हिंसक घटनांमध्ये प्रचंड वाढ होत चालल्याने गुन्ह्यांचे प्रमाणही तितकंच वाढलं आहे. हे सगळं कमी की काय म्हणून आता पुण्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. केवळ कारचा धक्का लागला म्हणून झालेल्या वादातून एका तरुणाचा खून करण्यात आला.
अभिजीत पोते, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 13 डिसेंबर 2023 : विद्येचं माहेरघर.. अशी पुण्याची ख्याती. पुणेकरांचे किस्से, टोमणे, चितळे बंधू, सवाई गंधर्व .. या आणि अशा अनेक गोष्टींमुळे पुण्याची ख्याती जगभरात पसरली आहे. पण सध्या पुणं शहर हे वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. सध्या पुण्यातील गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. कधी जेवणात चिकन दिलं नाही म्हणून बापानेच मुलीच्या डोक्यात थेट वीट मारल्याची घटना उघडकीस आली. तर कधी बॉसने Whatsapp ग्रुपवरून काढलं, त्या रागात कर्मचाऱ्याने बॉसला बांबूनेच झोडपल्याच प्रकार पुण्यात घडल्याचं समोर आलं.
दिवसेंदिवस पुण्यातील हिंसक घटनांमध्ये प्रचंड वाढ होत चालल्याने गुन्ह्यांचे प्रमाणही तितकंच वाढलं आहे. हे सगळं कमी की काय म्हणून आता पुण्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. केवळ कारचा धक्का लागला म्हणून झालेल्या वादातून एका तरुणाचा खून झाल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली आहे. ही घटना फुरसुंगी ते चंदवाडी रोड रस्त्यावर मंगळवारी घडली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय झालं ?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही हत्या झाली. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास फुरसुंगी ते चंदवाडी रोड रस्त्यावर ही घटना घडली. अभिषेक संजय भोसले (वय ३०, रा. शेवाळवाडी, मांजरी) असे मृत इसमाचे नाव आहे. केवळ कारचा धक्का लागला या मुद्यावरून अभिषेक याचा काही तरूणांशी वाद झाला. मात्र बघता बघता तो वाद खूप पेटला. याच वादातून आरोपींनी अभिषेक याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत त्याचा खून केला. याप्रकरणी विलास सुरेश सकट, कैलास सुरेश सकट, सचिन सकट (सर्व रा. चंदवाडी, फुरसुंगी) यांच्यासह आणखी ७ – ८ अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस अधिक तपास करत असून गुन्हेगारांना लवकरात लवकर शोधण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बॉसने Whatsapp ग्रुपवरून काढलं, रागावलेल्या कर्मचाऱ्याने बॉसला बांबूनेच झोडपलं
काही दिवसांपूर्वीच पुणं एका भयानक घटनेनं हादरलं होतं. बॉसने कंपनीच्या व्हॉट्सॲप ग्रुपमधून काढून टाकल्याने कर्मचारी दुखावला. आणि त्याने त्याच रागाच्या भरात ऑफीसमधील सर्व कर्मचाऱ्यांसमोरच बॉसला काठीने मारहाण केली. एवढचं नव्हे तर त्या संतप्त कर्मचाऱ्याने कार्यालयाची तोडफोड करत बॉसचा आयफोनही फोडला. ही संपूर्ण घटना पुण्यातील चंदन नगर येथील मुंडवा रोड जवळील एका कंपनीत घडली. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी कंपनीचे मालक अमोल शेषराव ढोबळे (वय 31) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. ते मूळचे लोहगाव येथील खांडवे नगर येथील रहिवासी आहेत. अमोल यांची इंस्टा गो प्राइवेट लिमिटेड कंपनी असून त्यांच्याच कंपनीत काम करणारा सत्यम शिंगवी याने रागाच्या भरात हल्ला करून आपल्याला मारहाण केल्याचे अमोल यांनी तक्रारीत नमूद केले