Baramati Bike Theft : बारामतीत चोरीच्या 27 मोटरसायकल हस्तगत, चार अल्पवयीन आरोपी ताब्यात; तालुका पोलिसांची कारवाई
अटक केलेल्या आरोपींकडून बारामती तालुका पोलिसांनी 27 मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या आरोपींनी दुचाकी लपवून ठेवल्या होत्या. पोलीस जेव्हा प्रत्यक्ष या मोटारसायकली ताब्यात घेण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी त्या पुरून ठेवल्याचे निदर्शनास आले.
बारामती : बारामती तालुका पोलिसांनी चोरीच्या मोटरसायकली (Bikes) जप्त करत चार सराईत चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी 3 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या 27 चोरीच्या मोटारसायकली जप्त (Seized) केल्या आहेत. बारामती एमआयडीसी परिसरातून मोटारसायकल चोरीच्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळं बारामती तालुका पोलिसांनी या चोरीच्या घटनांवर लक्ष केंद्रीत केलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी नगर आणि बीड जिल्ह्यातून या गाड्या शोधून या प्रकरणी चार जणांना ताब्यात (Detained) घेतले आहे. हे चौघेही सराईत चोरटे असल्याची माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे सर्व अल्पवयीन आहेत. याबाबत पोलीस आरोपींची कसून चौकशी करत आहेत.
मोटारसायकल लपवण्यासाठी आरोपींची युक्ती
अटक केलेल्या आरोपींकडून बारामती तालुका पोलिसांनी 27 मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या आरोपींनी दुचाकी लपवून ठेवल्या होत्या. पोलीस जेव्हा प्रत्यक्ष या मोटारसायकली ताब्यात घेण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी त्या पुरून ठेवल्याचे निदर्शनास आले. शेतांमध्ये चाऱ्यांच्या गंजीत या मोटारसायकली लपवून ठेवल्या होत्या, अशी माहिती पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिली. पोलिसांनी जप्त केलेल्या 27 पैकी अपवाद वगळता सर्व मोटारसायकली हिरो स्प्लेंडर आहेत. त्यावरून या चोरट्यांनी ठराविक कंपन्यांच्या मोटारसायकली लक्ष्य केल्याचे समोर आले आहे. हे सर्व चोरटे अल्पवयीन असून या चोरट्यांकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
लातूरमध्ये चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश
राज्यभरात धुमाकूळ घालणाऱ्या चोरट्यांच्या टोळीचा लातूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीकडून 53 लाखांच्या दागिन्यांसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या टोळीतील काही आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई झालेली आहे. औरंगाबाद, बीड, नांदेड, यवतमाळ या जिल्ह्यांसह राज्यातल्या अनेक ठिकाणी सराईतपणे घरफोडी करत सात जणांच्या या टोळीने लाखोंचे दागिने लुटले आहेत. भाड्याची कार घ्यायची आणि राज्यातल्या कोणत्याही शहरात जाऊन तिथे घरफोड्या करायच्या असा या टोळीची पद्धत आहे. लातूरच्या विवेकानंद चौक पोलिसांनी मोठ्या प्रयत्नाने या टोळीतील प्रमुख चार आरोपींना अटक केली आहे. या आरोपींमधील चारही जणांवर राज्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. (27 stolen motorcycles seized in Baramati, four juvenile accused in custody)