Baramati : विहिरीचं पाणी चोरल्यानं वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा, बारामती तालुक्यातील अजब प्रकार
जाधव यांनी कोरोना काळात या विहिरीवर बेकायदेशीर वीज कनेक्शन बसवून लाखों लीटर पाणी चोरल्याची फिर्याद सुधाकर रोकडे यांनी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात दिली आहे.
बारामती : आपण एरव्ही साहित्य किंवा पैसे चोरीला गेल्याची तक्रार झाल्याचं पाहतो. मात्र बारामती तालुक्यातील सुपे येथील एका विहिरीतून पाणी चोरल्या (Water Stealing)ची तक्रार वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश मारुती जाधव, विकास प्रकाश जाधव, राहुल ज्ञानेश्वर जाधव आणि अतुल ज्ञानेश्वर जाधव अशी तक्रार दाखल करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. निवृत्त पोलीस (Retired Police) कर्मचारी सुधाकर रोकडे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. जाधव यांना पाण्याबाबत विचारणा करण्यासाठी गेलो असताना त्यांनी शिवीगाळ व धमकी (Threaten) दिल्याचंही रोकडे यांनी फिर्यादीत म्हटलंय. त्यानुसार पाणी चोरीसह धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.
विहिरीवर बेकायदेशीर वीज कनेक्शन बसवून लाखों लीटर पाणी चोरल्याची फिर्याद
बारामती तालुक्यातील सुपे येथे सुधाकर रोकडे या सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याचं क्षेत्र आहे. ते सेवानिवृत्तीनंतर अंबरनाथ येथे स्थायिक झाले आहेत. त्यांच्या शेजारीच प्रकाश मारुती जाधव, विकास प्रकाश जाधव, राहुल ज्ञानेश्वर जाधव आणि अतुल ज्ञानेश्वर जाधव यांच्या मालकीचे क्षेत्र आहे. जाधव यांनी कोरोना काळात या विहिरीवर बेकायदेशीर वीज कनेक्शन बसवून लाखों लीटर पाणी चोरल्याची फिर्याद सुधाकर रोकडे यांनी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात दिली आहे. मी माझ्या मूळ गावी सुपे येथे वडिलोपार्जित शेती आहे. मध्यंतरीच्या कोरोना काळात आम्ही इकडे आलो नाही, त्याचा गैरफायदा घेऊन माझ्या विहिरीवर वीज कनेक्शन घेऊन दोन वर्षात लाखो लीटर पाणी चोरून नेल्याची तक्रार केल्याचं सेवानिवृत्त पोलिस अधिकारी सुधाकर रोकडे यांनी सांगितलं.
जाधव यांच्याकडून रोकडेंच्या आरोपीचाइन्कार
दरम्यान, रोकडे यांच्या आरोपाचा जाधव यांच्याकडून इन्कार करण्यात आलाय. 1998 साली मी हे क्षेत्र खरेदी केले. त्याच्या फेरफारमध्ये विहिर आणि वीज कनेक्शनसह खरेदीची नोंद आहे. असं असताना फिर्यादी दोन वर्षांपासून पाण्याबद्दलची तक्रार करतात. वास्तविक ही विहिरच 1998 पासून ताब्यात आहे. या क्षेत्राची रितसर मोजणी झाल्यानंतर जो निर्णय येईल तो मला मान्य असेल, असं प्रकाश जाधव यांनी म्हटलं आहे. चोरीच्या अनुषंगाने दाखल झालेल्या अनेक तक्रारी आपण पाहतो. मात्र बारामती तालुक्यात पाण्यासाठी चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. पाण्यासाठी संघर्षाची अनेक आंदोलने आपण पाहिलीत. मात्र आता पाण्यावरून व्यक्तिगत वादही उफाळून येत असल्याचं पहायला मिळतंय. (A case has been registered against four people in Vadgaon Nimbalkar Police Station for stealing well water in Baramati)