गावातील अतिक्रमण काढण्यावरुन दोन गटात जुंपली, घटना कॅमेऱ्यात कैद
या हाणामारीत एका गटातील एक जण गंभीर जखमी तर दोन जण किरकोळ जखमी झाले असून, जखमींवर रुग्णालयात सुरु आहेत. याप्रकरणी दोन्ही गटाकडून राजगुरुनगर पोलिसांत परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सुनील थिगळे, TV9 मराठी, राजगुरुनगर-पुणे : गावातील अतिक्रमण काढण्यावरुन पुण्याच्या खेड तालुक्यातील (Khed Pune) वाफगाव येथे दोन गटात तुंबळ हाणामारीची (Fighting in Two Political Groups) घटना घडली आहे. ही हाणामारीची घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल (Video on Social Media) झाला आहे. या घटनेमध्ये एका गटातील 17 जणांनी दुसऱ्या गटातील 3 जणांना घरात घुसून लाठी काठीच्या साह्याने मारहाण केली आहे.
हाणामारीत एक गंभीर, दोन किरकोळ जखमी
या हाणामारीत एका गटातील एक जण गंभीर जखमी तर दोन जण किरकोळ जखमी झाले असून, जखमींवर रुग्णालयात सुरु आहेत. याप्रकरणी दोन्ही गटाकडून राजगुरुनगर पोलिसांत परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राष्ट्रवादीच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षासह 17 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या भांडणामुळे दहशतीचे वातावरण पसरले आहे.
अतिक्रमण काढण्यावरुन वाद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याच्या खेड तालुक्यातील वाफगाव येथील बांधकाम विभागामार्फत रस्त्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी गावचे माजी सरपंच आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अजय भागवत आले होते.
यावेळी गावातील नितीन कराळे, सुरेश कराळे, स्वाती कराळे यांनी अतिक्रमण केले असल्याने याठिकाणी परस्परांमध्ये शिवीगाळ आणि बाचाबाची झाली. याचाच राग मनात धरून भागवत यांनी कराळे यांच्या घरात घुसून कुटुंबीयांना मारहाण केली.
नितीन कराळे, सुरेश कराळे, स्वाती कराळे आणि त्यांची दोन लहान मुलं त्यांना खोऱ्याच्या दांडकी, काठीच्या साह्याने जबर मारहाण केली. यामध्ये नितीन कराळे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पुण्यातील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
खेड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल
याप्रकरणी खेड पोलीस स्टेशनमध्ये परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याबाबत सचिन कालेकर यांनी खेड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून नितीन कराळे, सुरेश कराळे, स्वाती कराळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेश कराळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार राष्ट्रवादीच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष अजय भागवत यांच्यासह 17 जणांवर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्व आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.