पुणे : जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील वारुळवाडी येथून एक धकाकदायक घडना घडली आहे. उस वाहतूक करणाऱ्या टॅक्टरच्या ट्रॉलीखाली सापडून एका गरोदर महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, सोबत असणाऱ्या नातेवाइकांनी टाहो फोडला आहे. विद्या रमेश कानसकर असे 22 वर्षीय मयत महिलेचे नाव आहे.
ऊस वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॉली एकमेकाला जोडलेल्या असल्याने मागच्या ट्रॉलीखाली सापडून या महिलेचा मृत्यू झाला. या घटनेने जन्माला येण्यापूर्वीच बाळाला आणि त्याच्या आईला आपले प्राण गमवावे लागले आहेत. या घटनेने नागरिक संतप्त झाले होते.
याबाबत मृत महिलेचे पती रमेश कानसकर यांनी पोलिसात तक्रार दिली असून, चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. गोरक्ष सुखदेव ढेबरे असे ताब्यात घेण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे.
विद्या कानसकर या जुन्नर तालुक्यातील निमदरी येथील रहिवासी असून, आपल्या पती आणि आईसोबत नारायणगाव येथे चेकअपसाठी आल्या होत्या. वारूळवाडी येथून पुन्हा परतत असताना हा अपघात झाला.
रस्त्यात गतिरोधक आला म्हणून विद्या या गाडीवरून खाली उतरल्या. मात्र समोर येणाऱ्या दोन जोडणाऱ्या ट्रॉली भरून ट्रॅक्टरचा ट्रॉलीचा विद्याला धक्का लागला आणि विद्या खाली रस्त्यावर पडली. यावेळी तिच्या डोक्यावरून ट्रॅक्टरचे चाक गेले.
विद्याला तात्काळ उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. गरोदर महिलेचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या अपघातानंतर नागरिक संतप्त झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे हा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. अनेक वर्षापासून या ठिकाणी रस्त्याच्या साईड पट्ट्या भरल्या गेल्या नाहीत.
रस्त्याला असणाऱ्या कडांवर दुचाकी घसरून असे अपघात होत आहेत. सहा महिन्यापूर्वी देखील या परिसरात अशीच घटना घडली होती. त्यामुळे अजून किती जीव जाणार असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत.