मंचर : येडे वाकडे चाळे करुन फोटो काढू नकोस, असे सांगितल्याने अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील मंचर येथे उघडकीस आली आहे. या हल्ल्यात सदर विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राहुल आवारी असे हल्ला करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. आंबेगाव तालुक्यातील अवसरी मंचर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात ही घटना घडली आहे. याप्रकरणी मंचर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल आवारी आणि प्रतिक भोर हे दोन्ही विद्यार्थी आंबेगाव तालुक्यातील अवसरी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहेत. सदर महाविद्यालयात काहीतरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमादरम्यान प्रतिक फोटो काढत होता. यावेळी येडे वाकडे चाळे करुन फोटो काढू नकोस, असे राहुलने त्याला सांगितले. मात्र राहुलचे हे बोलणे प्रतिकला अपमानास्पद वाटले.
यानंतर तुला बघतोच म्हणत बाहेर जाऊन बोललेल्या शब्दाचा राग मनात धरून प्रतिकने कटरच्या साह्याने गळ्यावर, मानेवर, तोंडावर आणि हातावर सपासप वार केले.
यात राहुल जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच मंचर पोलिसांनी रुग्णालयात दाखल होत राहुलचा जबाब घेतला. त्यानंतर राहुल याने पोलिसांना संपूर्ण घटना सांगितली. राहुल आवारी हा खेड तालुक्यातील देव तोरणे गावचा रहिवासी आहे. शिक्षणासाठी तो मंचरला राहतो.
याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. हल्लेखोर विद्यार्थ्याला कडक शासन झाले पाहिजे, तरच अशा घटनांना वेळीच आळा बसेल अशी मागणी पालक आणि विद्यार्थी करत आहेत. दहशत निर्माण करणाऱ्या अन्य मुलांची नावे सांगावी, सांगणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन मंचर पोलिसांनी केले आहे.