कपडे धुण्यासाठी आईसोबत बंधाऱ्यावर गेला होता, पोहताना नदीत पात्रात बुडाला
शुभमचे बारावीपर्यंत शिक्षण झाले होते. यानंतर तो सातारा येथे खाजगी प्रशिक्षण संस्थेत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेत होता.
बारामती : कपडे धुण्यासाठी आईसोबत कऱ्हा नदी (Karha River)च्या बंधाऱ्यावर गेलेल्या तरुणाचा पोहताना (Swimming) पाण्यात बुडून मृत्यू (Death) झाल्याची धक्कादायक घटना रविवारी बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथे घडली आहे. शुभम संतोष खंडाळे असे 20 वर्षीय मयत तरुणाचे नाव आहे. घटस्थापनेच्या पूर्वसंध्येलाच ही दुःखद घटना घडली आहे. तरुणाच्या मृत्यूने खंडाळे कुटुंबीयांसह काऱ्हाटी गावावर शोककळा पसरली आहे.
आईसोबत गोधड्या धुण्यासाठी बंधाऱ्यावर गेला
शुभम खंडाळे हा त्याची आई जयश्री खंडाळे हिच्यासोबत कऱ्हा नदीच्या बंधाऱ्यावर गोधड्या धुण्यासाठी गेला होता. गोधड्या धुवून झाल्यानंतर तो आणि त्याचा मित्र बंधाऱ्यात पोहण्यासाठी उतरले. याच दरम्यान पोहताना त्याचा मृत्यू झाला.
खंडाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर
शुभमच्या अचानक जाण्याने खंडाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शुभमच्या वडिलांची वडापावची गाडी आहे. शुभम वडिलांना त्यांच्या वडापावच्या आणि केरसुणी बनवण्याच्या धंद्यात मदत करायचा.
पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेत होता शुभम
शुभमचे बारावीपर्यंत शिक्षण झाले होते. यानंतर तो सातारा येथे खाजगी प्रशिक्षण संस्थेत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेत होता. सध्या तो सुट्टीसाठी घरी आला होता. आईसोबत नदीवर गेला आणि बुडून त्याचा दुर्दैवी अंत झाला.