पुणे / सुनील थिगळे (प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूर परिसरात एका कंपनीच्या ठेकेदाराचे अपहरण (Kidnapping) करून खंडणीसाठी मारहाण केल्याप्रकरणी मुख्य आरोपीला जेरबंद करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले आहे. महेश जगताप असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या अपहरणकर्त्याचे नाव आहे. सणसवाडी येथील कंपनीच्या ठेकेदाराचे अपहरण करुन निर्जन ठिकाणी नेऊन त्याला लाकडी दांडक्याने मारहाण केली होती. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देऊन दोन लाखांची खंडणी (Ransom) घेतल्याबाबत गुन्हे दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होऊनही हा आरोपी चार महिन्यांपासून खुलेआम फिरत राजकीय लोकांची नावे सांगून पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर महेश जगतापला जेरबंद करण्यात शिक्रापूर पोलिसांच्या पथकाला नुकतेच यश आले आहे.
सणसवाडी येथील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे ठेकेदार फुलसिंग यादव हे 4 मे 2022 रोजी कंपनीतून रात्रीच्या सुमारास घरी जात होते. यावेळी काही युवकांनी त्यांना निर्जनस्थळी घेऊन जात शिवीगाळ, दमदाटी करुन लाकडी दांडक्याने मारहाण केली.
तसेच महेश जगताप माहित आहे का आम्ही त्याची माणसे आहोत, तुम्ही आम्हाला साडेतीन लाख रुपये द्यायचे नाहीतर मारून टाकण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडून दोन लाख रुपयांची खंडणी घेतली होती.
याबाबत फुलसिंग यांची पत्नी रेवती यादव यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. या गुन्ह्यातील काही आरोपींना शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केले. फुलसिंग यादव मूळचे राजस्थानमधील असून कामानिमित्त पुण्यात राहतात.