आई आणि मुलाला मृत्यूने एकाच वेळी गाठलं! काळीज पिळवटून टाकणारी घटना
मुलगा आईला दुचाकीवरुन घेऊन जात होता, पण तो प्रवास त्यांचा अखेरचा प्रवास ठरला

पुणे : बारामती तालुक्यात (Baramati) बुधवारी भीषण (Pune Accident) अपघातात तिघांनी जीव गमावला. यात मायलेकरांसह एका वृद्ध इसमाचाही समावेश आहे. भरधाव कार दुचाकीवरुन (Car Bike Accident) जाणाऱ्या आई आणि मुलाला धडकली. यात दोघे जागीच ठार झाले. तर रस्ता ओलांडणाऱ्या एका वृद्द इसमालाही भरधाव कारने चिरडल्याने तो ही मृत्युमुखी पडला. या घटनेनं एकच खळबळ उडाली होती.
बारामती मोरगाव रस्त्यावर फोंडवाडा इथं गावच्या हद्दीत हा अपघात या घडला होता. भरधाव टोयोटा अर्बन क्रूझर कार चालकानं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि हा अपघात घडला होता. या अपघातात कारचंही मोठं नुकसान झालं होतं. दरम्यान, तिघांना चिरडल्यानंतर कार चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला.
या अपघाताची पोलिसांनी नोंद करुन घेतलीय. पुढील तपास केला जातोय. मृतांची ओळखही पटली असून या घटनेनं हळहळ व्यक्त केली जातेय.
अपघातील मृतांची नावे
- दशरथ साहेबराव पिसाळ, वय 62, राहणार फोंडवाडा, माळवाडी, ता. बारामती
- अतुल गंगाराम राऊत, वय 22, राहणार करावागज, ता. बारामती
- नंदा राऊत, राहणार करावागज, ता बारामती
नंदा राऊत या आपल्या मुलासह गुरुवारी संध्याकाळी दुचाकीवरुन जात होत्या. दुचाकीवर जात असलेल्या आई आणि मुलाला एकाच वेळी मृत्यूने वाटेत गाठलं. दुचाकीवरुन केलेल्या त्यांचा प्रवास हा आयुष्यातील अखेरचा प्रवास ठरला.
दरम्यान, 62 वर्षांची वृद्ध व्यक्ती दशरथ पिसाळ हे रस्ता ओलांडत असताना त्यांना कारने चिरडलं. यामुळे एकाच अपघातात तिघे ठार झाले.
नंदा राऊत या अपघातात गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. पण त्यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. आई आणि मुलाच्या मृत्यूने राऊत कुटुंबीयांना मोठा धक्का बसलाय.
भरधाव अर्बन क्रूझर MH 14 KF 3464 ही कार पुण्याला जात असताना हा अपघात घडला. तर दुचाकी पुण्याहून बारामतीला येत होती. या अपघाताचं मुख्य कारण काय होतं, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला असावा, अशी शंका घेतली जातेय.